

पुणे: महापालिकेचे मुख्य भवन गेल्या काही दिवसांपासून विविध वादांमुळे चर्चेत आले. त्यातच बुधवारी भाजपच्या विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये तीव वाद होऊन शिवीगाळ झाल्याची घटना घडली. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येत असलेल्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून हा वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
मनपामार्फत बाणेर येथे आदिवासी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे सुमारे 85 ते 90 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी 3 कोटी रुपयांचा निविदा प्रस्ताव काढण्यात आला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मनपा भवनातील भवन विभागात बुधवारी राजश्री काळे, विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. या वेळी काळे आणि चिमटे यांच्यात जोरदार वाद झाला आणि त्यातून शिवीगाळही झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मनपा वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
यासंदर्भात राजश्री काळे यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी त्यांनी सुरुवातीपासून पाठपुरावा केला असून, आता काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थिनींसाठी लवकरच चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र, उर्वरित कामाच्या निविदेवर ‘टक्केवारी’च्या मुद्द्यावरून रोहिणी चिमटे यांनी अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी केला. टक्केवारी मिळेपर्यंत काम सुरू करू नका, अशी धमकी कंत्राटदाराला देण्यात आली असून, “मी स्थायी समिती सदस्य आहे, काम होऊ देणार नाही,” असे सांगण्यात आल्याचा दावा काळे यांनी केला. यामुळेच वाद निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रोहिणी चिमटे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, या प्रकल्पातील सीमाभिंतीचे काम अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे शेजारील नागरिकांना त्रास होत असल्याने ते काम प्रथम पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली होती. मनपा भवन विभागाचे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या निविदेला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
यापूर्वीही झाला होता वाद
या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. माजी नगरसेविका राजश्री काळे आणि काँग््रेास कार्यकर्ते परेश गुरव यांच्यात याच मुद्यावरून वाद झाला होता. त्या वेळी काळे यांनी गुरव यांच्याशी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. तसेच या प्रकल्पात अडथळा आणू नये, ही सुविधा आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारली जात असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.