

पुणे: वाहतूक पोलिसांकडून टँकरमध्ये हेल्परसक्तीसाठी केल्या जाणाऱ्या 1500 रुपयांच्या दंडवसुलीच्या निषेधार्थ पुण्यातील खासगी टँकरमालकांनी बुधवारी दिवसभर बेमुदत संप पुकारला होता. मात्र, रात्री उशिरा महापौर मंजूषा नागपुरे यांनी मध्यस्थी करून पुढील पंधरा दिवसांसाठी दंडाची कारवाई शिथील केली. त्यामुळे टँकरमालकांनी हा संप बुधवारी रात्री उशिरा मागे घेतल्याची माहिती टँकरमालक सुशांत लोणकर यांनी दिली आहे.
टँकर चालक-मालक हे संकटकाळात शहराला पाणीपुरवठा करतात. असे असतानाही आम्हाला वारंवार टँकरमाफिया म्हणून हिणवले जाते. हा अपमानकारक टॅग पुसण्यासाठी आणि आमची प्रतिमा सुधारण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.
वाहतूक पोलिसांकडून टँकरचालकांना विनाकारण त्रास दिला जात आहे. नियमांच्या नावाखाली मोठी दंडवसुली केली जाते. विशेषतः हेल्पर नसल्यास 1500 रुपयांची पावती फाडली जाते. हेल्पर अनिवार्य केल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड सोसायट्यांना बसणार आहे, त्यामुळे आम्ही हा संप पुकारला होता, मात्र, रात्री उशिरा महापौर मंजूषा नागपुरे यांनी मध्यस्थी केल्यामुळे आम्ही आज संप मागे घेतला आहे, असे टँकरमालक सुशांत लोणकर यांनी सांगितले आहे.
आजचा नियोजित पाणीपुरवठा बंद पुढे ढकलला
वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाने टँकरचालकांबाबत काही कठोर भूमिका घेतली आहे. त्याविरोधात टँकरचालकांनी संप पुकारला आहे. या टँकरचालकांच्या संपासह काही तांत्रिक कारणांमुळे गुरुवारी (दि. 16) महापालिकेने नियोजित पाणीपुरवठा बंद (क्लोजर) पुढे ढकलला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी निवेदन जाहीर केले आहे. त्यामध्ये प्रस्तावित बंदच्या पुढील तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संभमित न होता अधिकृत सूचनेकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू राहणार असून, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे, असे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.