Pune Metro  Pudhari
पुणे

Pune Metro Coaches: पुणे मेट्रोमध्ये वाढणार डबे? वाढत्या गर्दीमुळे महामेट्रोची तयारी; ६ डब्यांच्या ट्रेनचा पर्याय

अतिरिक्त डब्यांसाठी डीपीआर तयार; राज्य शासनाच्या मंजुरीनंतर केंद्राकडे प्रस्ताव, ऑगस्टमध्ये ७४ लाखांहून अधिक प्रवाशांचा विक्रमी प्रवास

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मेट्रोच्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता महामेट्रोने पुण्यातील मेट्रो ट्रेनच्या डब्यांमध्ये वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महामेट्रोकडून तयार केला असून, तो लवकरच अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचा मेट्रो प्रवासाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी प्रवाशांना डब्यांमध्ये जागा मिळणे कठीण होत असून, मेट्रोसेवा अधिक क्षमतेने चालवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. सध्या तीन डब्यांची मेट्रो चालवली जात आहे. मात्र, भविष्यातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यात महत्त्वाचे म्हणजे सणासुदीच्या काळात (गणेशोत्सव, दहीहंडी) मेट्रोला प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे मेट्रो ट्रेनचे डबे वाढव ण्याची मागणी पुणेकर प्रवाशांकडून केली जात आहे.

...याकरिता केंद्राची मंजुरी आवश्यक असणार

नवीन डबे खरेदी करण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. त्यामुळे केंद्रीय मंजुरी आणि आर्थिक साहाय्य या प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्राकडून या अहवालाला हिरवा कंदील मिळताच नव्या डब्यांची मागणी, त्यांची जोडणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचे नियोजन महामेट्रोकडून केले जाणार आहे.

प्लॅटफॉर्मवर ६ डब्यांची एक ट्रेन उभी राहू शकते

सध्या मेट्रोच्या ट्रेनला तीन डबे आहेत, प्रवासीसंख्या वाढत असल्याने आता डबे वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर ६ डब्यांची एक ट्रेन उभी राहू शकते, अशी क्षमता आहे. मेट्रो प्रशासन डबे वाढवण्याचे नियोजन करीत असून, नक्की किती डबे एका ट्रेनला वाढतील, हे अनिश्चित असले तरी वाढत्या प्रवासीसंख्येनुसार आणि उपलब्ध निधीनुसार नक्कीच मेट्रोच्या गाड्यांचे डबे मेट्रो प्रशासनाकडून वाढवले जाण्याची शक्यता आहे..

सन २०२६ मधील मेट्रो प्रवाशांची संख्या

  • जानेवारी : ६२ लाख १३ हजार १०९

  • फेब्रुवारी : ५५ लाख २१ हजार ८८०

  • मार्च : ५७ लाख ६९ हजार २२१

  • एप्रिल : ५९ लाख ३४ हजार ८३६

  • जून : ५८ लाख ३८ हजार ११८

  • जुलै : ५७ लाख ४९ हजार ९२४

  • ऑगस्ट : ७४ लाख २४ हजार ४३३

मेट्रोचे डबे जोडण्यासाठी आवश्यक डीपीआर तयार केला आहे. हा अहवाल आधी राज्य शासनाला व तिथून पुढील मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. अतिरिक्त डब्यांच्या खरेदीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने या डीपीआरला केंद्राची अधिकृत मंजुरी मिळणे आवश्यक आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतरच डबे वाढवण्याबाबतचे प्रत्यक्ष आणि सविस्तर नियोजन होईल. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर डब्यांची खरेदी प्रक्रिया गतिमान होईल, त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित व आरामदायी प्रवास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT