

सुनील माळी
बहुसंख्य पुणेकरांना गणेशोत्सवातील कर्णकटु आवाजाच्या होणाऱ्या त्रासाबाबत उघडपणाने महापालिकेच्या सभागृहातील नागरी बैठकीत आवाज काढण्याचे धाडस दाखवणाऱ्या विद्यानंद बापट यांना त्यानंतरच्या अवघ्या काही दिवसांतच पुणेकरांचा भरभरून पाठिंबा मिळाला. सोशल मीडिया तसेच यु ट्युबवरील त्यांच्या मुलाखती केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यात अन राज्यातच नव्हे तर परदेशातही गाजल्या..., मात्र दुर्दैवाने सातत्याने मीडियासमोर बोलत असलेल्या बापटांचा वाचिक तोल ढासळत चालला असून त्यामुळे ते हळूहळू पुणेकरांच्या मनातून उतरू लागले आहेत. अर्थात ते पुणेकरांच्या मनातून उतरतात का त्यांच्या मनावर राज्य करतात ?, याबद्दल विवेकी पुणेकरांना काहीच देणेघेणे नसले तरी त्यामुळे तमाम पुणेकरांच्या या लाडक्या जनोत्सवातील दोष दूर करण्याच्या चळवळीला धक्का बसू शकतो, ही भीती आहे.
पुणेकर बापटांच्या वक्तव्यामागे उभे राहिले ते केवळ डीजेच्या मुद्द्यामुळेच. कर्णकटु संगीत (त्या धडकी भरवणाऱ्या ओरड्याला संगीत कसे म्हणावे ?) छातीत धडकी भरवत असल्याने सामान्य पुणेकरांची त्याबाबत तीव्र भावना होती, मात्र त्याविरोधात कोण बोलणार ?... पण इथे एक सर्वसामान्य माणूस सर्व उत्सवी पदाधिकारी-कार्यकर्त्यांसमोर निर्भीडपणाने उभा राहिला, परखड भाषेत बोलला आणि सुरक्षा रक्षकांकडून बाहेर काढण्यात आल्यानंतरही आपल्या अस्खलित मराठीत (जिची दखल कालपरवा अगदी मुख्यमंत्र्यांनाही घ्यावीशी वाटली) मुद्देसूद, बिनतोड बोलत राहिला. झाले..., 'तुझे व्ह्युअर्स अधिक का माझे अधिक ?' 'तुझ्या चँनेलचा टीआरपी जादा का माझ्या ?' या विवंचनेत सतत असणारे यु ट्युबर आणि बूमबहाद्दर मीडियामेननी त्यांच्या भोवती कोंडाळे केले. त्या मुलाखतींच्या व्ह्युअर्सची संख्या लाखापुढे जाऊ लागली तशी आणखी उत्साह येऊन ज्याने त्याने मुलाखतींचे गुऱ्हाळ सुरू केले, पण या अतिप्रसिद्धीनेच डीजेमुक्तीच्या चळवळीचा घात झाला. वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये वेगवेगळी मते बापटांकडून व्यक्त होत असताना त्यांच्यात आंदोलनाच्या किंवा अधिक सार्थ शब्दांत चळवळीच्या यशस्वितेसाठी आवश्यक असलेला धोरणीपणा, संयम, विवेक, मुत्सद्देगिरी, चातुर्य, प्रसंगावधान यांची ठसठशीतपणाने उणीव दिसून आली.
बापट केवळ 'डीजेविरोध' हा बहुमान्य मुद्दा घेऊन थांबले असते किंवा केवळ तोच त्यांनी चळवळीच्या या पहिल्या टप्प्यात शेवटपर्यंत लावून धरला असता तर त्यांचे यश त्यांच्याच शुद्ध मराठीचा उपयोग करायचा तर धवल झाले असते, निर्भेळ ठरले असते. पुणेकर एकदिलाने जरी शक्य नसले तरी बहुदिलाने त्यांच्या मागे कायम उभे राहिले असते... पण... पण इथेच पुणेकरांच्या दुर्दैवाला सुरूवात झाली. बापटांनी वेगवेगळ्या विषयांवरील आपली वैयक्तिक मते, आग्रह, ग्रह, धारणा बाहेर काढायला सुरूवात केली. पूर्णपणाने डाव्या म्हणजे साम्यवादी-कम्युनिस्ट विचारसरणीची छाप त्यावर स्पष्टपणाने दिसत होती. आता साम्यवादी-डावी विचारसरणी असणे यात काहीच आक्षेपार्ह नाही, तसेच ती ठासून मांडणे हेही घटनाविरोधी किंवा चुकीचे नाही. चूक एवढीच होती की 'उत्सव शुद्ध, रसरशीत, अधिकाधिक लोकाभिमुख, त्रास नव्हे तर आनंद देणारा हवा', एवढ्याच भावनेतून बापटांमागे उभे राहिलेल्या पुणेकरांना ही सगळी मते पटलीच पाहिजेत, असा आग्रह कसा धरता येईल ? त्यामुळे आतापर्यंत त्यांच्या धारणेबरोबर असलेल्या पुणेकरांची चलबिचल होऊ लागली आणि त्यामुळेच बापटांच्या पाठिंब्याला गळती लागू लागली आहे. आपली या टप्प्यातील चळवळ यशस्वी होण्याच्या बेतात असताना अशा वादग्रस्त विधानांनी चळवळीची शक्ती कमी करणाऱ्या नेतृत्वाला धोरणी, मुत्सद्दी कसे म्हणता येईल ?
बापटांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी होती की पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव हा तमाम पुणेकरांचा उत्सव आहे, ती त्यांची अस्मिता आहे. लोहियानगरमधले रहिवासी जसे या उत्सवावर प्रेम करतात, तसाच भरभरून सहभाग नाना-भवानी-सदाशिव-शनिवार पेठांतल्या जुन्या वाड्या-सोसायट्यांत अन कोथरूडच्या महात्मा सोसायटीतल्या बंगल्यात राहणारेही घेतात. येरवडा-हडपसर-कात्रज अशा उपनगरांतून भरभरून बसगाड्या अन आता मेट्रोही येतात. या उत्सवाची लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण वाट पाहतात, उत्साहाने तयारी करतात. वर्षभराच्या नेहमीच्या, नीरस कामातून विरंगुळ्याचे, करमणुकीचे, आनंदाचे चार क्षण त्यांना मिळतात, पुढचे संपूर्ण वर्ष पुन्हा काम करायची उमेद त्यामुळे येते. निमित्त मांडवात बसलेल्या श्रींच्या मूर्तीचे असते, पण त्यामुळे सारा समाज एकवटतो, सामूहिक ताकदीने अनेक सामाजिक कामेही लिलया उचलतो. जात-धर्म-पंथांची बंधने ओलांडून सामाजिक ऐक्याची वाटचाल या उत्सवाच्या निमित्ताने होते. फुलवाल्यांपासून ते मूर्तीकारांपर्यंत, मांडववाल्यांपासून ते सजावटीचे साहित्य विकणाऱ्या बोहऱ्यांपर्यंत, आतार समाजाच्या कुंकुवाल्यांपासून ते ढोल-ताशांची विक्री-दुरूस्ती करणाऱ्या कारागीरांपर्यंत, चहाची टपरी टाकणाऱ्यांपासून ते पावभाजीचे गाडे लावणाऱ्यांपर्यंतची आर्थिक उलाढाल या उत्सवाने होते. पुण्याचा हा आत्मा न ओळखताच बापट पुण्यात गेली सात-आठ वर्षे राहिले की काय न कळे ?, पण 'उत्सवाचीच गरज नाही', असे अस्सल पुणेकरांना न आवडणारे वक्तव्य त्यांनी केले. ते नास्तिक असतील, पण ते यावेळी आपली उत्सवविरोधी भूमिका प्रकर्षाने मांडण्याची काही गरज होती का ? अलबत, त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे धर्म पालन करण्याबरोबरच धर्मापासून दूर राहण्याचा हक्कही घटनेने दिला आहे, मात्र त्यामुळे डीजे मुक्तीच्या चळवळीच्या या टप्प्यात आपला जनमताचा पाठिंबा गमावून बसण्याची प्रक्रिया त्यामुळे सुरू झाली, हे चळवळीचे दुर्दैव.
'पोलिसांच्या बलप्रयोगाने मंडळे ऐकत नसतील तर लष्कर बोलवा- रणगाडे आणा', 'लष्करे तोयबा प्रमाणे हा लष्करे उत्सव झाला आहे', ही त्यांची मुक्ताफळे त्यांचा वाचिक तोल सुटत चालल्याचीच लक्षणे दाखवतात. त्याहून कळस म्हणजे 'मी अमेरिकेत नाही, हे दुर्दैव. तिथे खासगी व्यक्तींना रिव्हॉल्व्हर-बंदुका बाळगता येतात. मग संरक्षणासाठी पोलिसांची गरज उरली नसती...' अशा अर्थाची त्यांची विधाने. शस्त्र वापराचा परवाना असता तर मग आपण नियम मोडणाऱ्यांवर किंवा स्वसंरक्षणार्थ गोळीबारच केला असता, असेच ही विधाने सुचवत नाहीत काय ?
'मी नास्तिक आहे आणि सामाजिक कामे करायला मंडळांची-उत्सवाची गरज लागत नाही, निधर्मी-सोशँलिस्ट पद्धतीने ती करता येतात', असे मत बापट मांडतात. त्यांच्या नास्तिक असण्याला आणि नास्तिकतावादाचा प्रसार करण्याला कुणाचीच हरकत असणार नाही. आपल्या देशाच्या संस्कृतीत चार्वाकाने मांडलेल्या नास्तिकतावादाचीही तात्त्विक चर्चा झालेली आहे, पण ती चर्चा सुरू करण्याची वेळ चुकीची होती, असे वाटत नाही का ?
समाजात तुम्हाला बदल घडवायचा असेल तर तो एकाच दिवसात होत नाही. पहिलीच्या विद्यार्थ्याला पदवीच्या अभ्यासक्रमाचे प्रश्न विचारायचे नसतात तर त्याला अनेक इयत्ता ओलांडाव्या लागतात. समाजात क्रांती एका रात्रीत होते, पण सामाजिक परिवर्तनाला अनेक पिढ्या लागतात. त्यासाठी समाजाच्या पोटात जावे लागते, त्यांच्यात मिसळावे लागते, त्यांना आपले म्हणावे लागते, रूढी-परंपरा-समजुती यांच्यातील फोलपणा हळूहळू लक्षात आणून द्यावा लागतो. गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत बदल घडवायचा असेल तर मंडळांमध्ये जा, त्यांच्यात मिसळा आणि प्रबोधन करा... महापालिकेतील एका सभेनंतर मिळालेल्या भल्यामोठ्या प्रसिद्धीमुळे संपूर्ण समाज तुमचे ऐकेल, हा भ्रम असेल तर तो काढून टाकणेच श्रेयस्कर...
'समविचारी मंडळींबरोबर आपण संघटित लढा देऊ', असे बापटांनी आता जाहीर केले आहे. या समविचारी मंडळींमध्ये समबुद्धीने विचार करणारी मंडळीही असतील, अशी आशा आहे. बापट पोलिस ठाण्यात तक्रार करायला गेले असताना ठाण्याबाहेर त्यांची वाट पाहणाऱ्यांमध्ये समाजमाध्यमांवर सक्रिय असणारे चेहरे दिसत होते. श्रीकृष्णाचा दाखला देणे कोणा नास्तिकाला आवडेल किंवा आवडणार नाही, पण त्याने 'न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' असे म्हणत अर्जुनाला सल्ला देण्याचे काम स्वीकारले, तसेच या पडद्यामागील पाठिराख्यांनी या विद्यानंदांना डीजेमुक्तीच्या चळवळीच्या यशस्वितेसाठी युक्तीचा सल्ला द्यावा, अशी अपेक्षा आतापर्यंत त्यांच्या पाठिशी राहिलेल्या सुजाण पुणेकरांची असली, तर त्यात गैर काय ?