Pune Metro  Pudhari
पुणे

Pune Metro: गर्दीच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोच्या सहा स्थानकांवर बदल; अनंत चतुर्दशीनिमित्त प्रवाशांच्या दृष्टीने नियोजन

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोची सलग ४१ तास सेवा. पीसीएमसीसह सहा मेट्रो स्थानकांच्या प्रवेश आणि निर्गमन व्यवस्थेत २५ सप्टेंबरला तात्पुरते बदल.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) गर्दीचे नियोजन करण्यासाठी मेट्रोची वारंवारिता वाढवून सलग ४१ तास सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार पीसीएमसी स्थानक, डेक्कन जीमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, रामवाडी, एसएनडीटी आणि गरवारे महाविद्यालय या सहा स्थानकातील प्रवेश आणि निर्गमन व्यवस्थेत आज (दि. २५) तात्पुरते बदल केले आहेत.

गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक शहराच्या मध्यवर्ती भागात दाखल होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांची सुरक्षितता आणि गर्दीचे व्यवस्थापन यासाठी स्थानकनिहाय गेट निश्चित करण्यात आले आहेत. ही व्यवस्था शनिवार (दि. २६ सप्टेंबर) पासून पूर्ववत होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

पीसीएमसी स्थानकात फिनोलेक्स चौक बाजूची गेट क्रमांक १ व ४ प्रवेशासाठी, तर पीसीएमसी भवन बाजूची गेट क्रमांक २ व ३ निर्गमनासाठी वापरता येतील. डेक्कन जिमखाना स्थानकात वनाज बाजूचे गेट क्रमांक १ प्रवेशासाठी, तर रामवाडी बाजूची गेट क्रमांक २ व ३ निर्गमनासाठी असतील.

छत्रपती संभाजी उद्यान स्थानकात वनाज बाजूची गेट क्रमांक १, ३ व ४ प्रवेशासाठी आणि रामवाडी बाजूचे गेट क्रमांक २ निर्गमनासाठी ठेवण्यात आले आहे. एसएनडीटी स्थानकात गेट क्रमांक १ व ४ प्रवेशासाठी, तर गेट क्रमांक २ निर्गमनासाठी असेल. गरवारे महाविद्यालय स्थानकात गेट क्रमांक १ व ४ प्रवेशासाठी आणि गेट क्रमांक ३ निर्गमनासाठी राहील.

पीएमसी स्थानकात रामवाडी बाजूचे गेट क्रमांक ३ प्रवेशासाठी, तर वनाज बाजूचे गेट क्रमांक १ निर्गमनासाठी निश्चित करण्यात आले असल्याचे मट्रोकडून नमूद करण्यात आले.

प्रवाशांनी नियोजनानुसार प्रवास करावा

महात्मा फुले मंडई स्थानक परिसरातूनच मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन मिरवणुकीला गर्दी असते, म्हणून या सुरुवातीपासूनच बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे बॅरिकेडिंग हटविले जाईपर्यंत या स्थानकातील प्रवेश-निर्गमन व्यवस्था विशेष नियोजनानुसारच राहणार आहे. प्रवाशांनी बदललेल्या व्यवस्थेची नोंद घेऊन मेट्रो प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT