Mulshi Dam Water Pune: मुळशी धरणातून पुण्यासाठी पाणी आणण्याच्या हालचालींना वेग

पुण्याच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन मुळशी धरणातून ५ ते ७ टीएमसी पाणी मिळवण्याच्या हालचालींना वेग. व्यवहार्यता तपासण्यासाठी ३ वर्षांसाठी ३ कोटींचा सल्लागार नियुक्त होणार.
Mulshi Dam
Mulshi DamPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन मुळशी धरणातून पाच ते सात टीएमसी पाणी पुण्यासाठी उपलब्ध करून घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी महापालिकेकडून सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महापालिकेच्या इस्टिमेट समितीने मंजुरी दिली असून, तीन वर्षांसाठी तीन कोटी रुपये खर्च करून सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पुणे शहराला मुळशी धरणातून पाणी मिळावे, यासाठी महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या मागणीला राज्य सरकार तसेच टाटा कंपनीकडून तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष प्रकल्पाच्या दृष्टीने पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.

मुळशी धरणातून पुण्याला पाणी आणण्यासाठी कोणता मार्ग वापरता येईल, पाणी उचलण्याची व्यवस्था कशी असेल, प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा कोणत्या असतील आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येईल, याचा सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी जलपुरवठा विभागाला दिले आहेत. त्यानुसार सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

खडकवासल्यावरील ताण कमी करण्याचा पर्याय

सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा भविष्यातील गरजांच्या तुलनेत अपुरा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुळशी धरणातून अरबी समुद्राच्या दिशेने वाहून जाणाऱ्या पाण्याचा गैरसिंचनासाठी उपयोग करण्याचा पर्याय पुढे आला आहे.

खडकवासला धरणावरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी मुळशीचे पाणी गैरसिंचनासाठी वापरण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकार तसेच टाटा कंपनीने तत्त्वतः मान्यता दिली आहे.

मात्र, हे पाणी नेमके केव्हा, कशा पद्धतीने आणि कोणत्या ठिकाणी वापरता येईल, याचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी जलसंपदा विभागाने टाटा कंपनी आणि जलसंपदा विभागातील तज्ज्ञ अधिकार्‍यांचा अभ्यासगट स्थापन केला आहे. या गटाचे काम सध्या सुरू आहे.

सात टीएमसी पाणी पूर्वेकडे वळवण्याची शक्यता

मुळशी धरणाची एकूण उपयुक्त जलसाठा क्षमता १८.४७ टीएमसी, तर मृत जलसाठा ८.१२ टीएमसी आहे. या पाण्याचा उपयोग करून ३०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. याशिवाय बोगदा प्रकल्पासाठी १.६५ टीएमसी पाण्याचा वापर होतो.

या सर्व वापरानंतर उपलब्ध पाण्यातून बाष्पीभवनाचा विचार करता सात टीएमसी पाणी पूर्वेकडे, म्हणजेच पुणे शहराच्या वापरासाठी वळवणे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य असल्याचे समोर आले आहे. या शक्यतेची तांत्रिक, आर्थिक आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने सविस्तर तपासणी आता प्रस्तावित सल्लागारामार्फत केली जाणार आहे.

मुळशी धरणातून पुणे शहरासाठी पाणी आणण्याचा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या किती व्यवहार्य आहे आणि त्यासाठी किती खर्च येईल, याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येत आहे. हा सल्लागार प्रकल्पाची विस्तृत फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करणार आहे.

- पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news