पुणे: रजोनिवृत्तीच्या काळातील महिलांच्या आरोग्य समस्यांकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेच्या सात रुग्णालयांत सुरू करण्यात आलेल्या मेनोपॉज क्लिनिकला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फेबुवारीपासून सुरू झालेल्या या क्लिनिकमध्ये गेल्या दोन महिन्यांत तब्बल 2 हजार 585 महिलांनी तपासणी व उपचार घेतले आहेत.
शहरातील कमला नेहरू रुग्णालय (मंगळवार पेठ), सोनवणे प्रसूतीगृह (भवानी पेठ), दळवी दवाखाना (शिवाजीनगर), राजीव गांधी दवाखाना (येरवडा), सुतार दवाखाना (कोथरूड), कोद्रे रुग्णालय (मुंढवा) आणि मगर हॉस्पिटल (मगरपट्टा) येथे दर बुधवारी 45 ते 55 वयोगटातील महिलांसाठी ही क्लिनिक भरवली जातात.
रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा असला तरी या काळात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे विविध शारीरिक व मानसिक समस्या उद्भवू शकतात. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने देशात प्रथमच शासकीय स्तरावर मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, पुण्यातही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.
उपाय काय?
नियमित तपासणी व तज्ज्ञांचा सल्ला
औषधोपचार व हार्मोनल व्यवस्थापन
संतुलित आहार व नियमित व्यायाम
मानसिक आरोग्य समुपदेशन
मेनोपॉज क्लिनिक का आवश्यक?
रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोनल बदलांमुळे विविध आरोग्य समस्या
हाडांची ठिसूळता (ऑस्टिओपोरोसिस) होण्याचा धोका अधिक
हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता
चिडचिड, चिंता, नैराश्य यांसारख्या मानसिक समस्या
वेळेवर निदान व उपचार न झाल्यास दीर्घकालीन आरोग्य परिणाम
क्लिनिकमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी, आवश्यक चाचण्या, औषधोपचार, मानसिक आरोग्य समुपदेशन तसेच आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाते. पुणे शहर व जिल्ह्यात मिळून सध्या 31 क्लिनिक सुरू असून, त्यांचा विस्तार टप्प्याटप्प्याने केला जात आहे.डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी