Pune Balcony Rescue Video Goes Viral Pudhari
पुणे

Pune Viral Video: बाल्कनीत अडकले, घरातलं कोणी उठेना; मदतीसाठी थेट Blinkit ला केला फोन, Viral Video

Pune Viral Video: पुण्यात पहाटे तीन वाजता तीन तरुण चुकून स्वतःच्याच घराच्या बाल्कनीत अडकले. मदतीसाठी त्यांनी थेट Blinkit वर ऑर्डर टाकून डिलिव्हरी एजंटला घर उघडायला सांगितलं.

Rahul Shelke

Pune Balcony Rescue Video Goes Viral on Instagram: पुण्यात मध्यरात्री घडलेली एक गंमतीशीर घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ही घटना पहाटे सुमारे तीनच्या सुमाराची आहे. पुणे येथे राहणारे मिहीर गहूकर आणि त्याचे दोन मित्र बाल्कनीत उभे असताना घराचा दरवाजा आतून बंद झाला. घरात असलेले लोक गाढ झोपेत होते. फोन करूनही कोणी उठत नव्हतं, दरवाजा उघडण्याचा कोणताही मार्ग नव्हता आणि बाल्कनीतून खाली जाण्याचाही पर्याय नव्हता.

अशा वेळी या तरुणांनी एक भन्नाट कल्पना लढवली. त्यांनी थेट Blinkit या क्विक कॉमर्स अ‍ॅपवर ऑर्डर टाकली. डिलिव्हरी एजंट घराजवळ पोहोचल्यावर त्याला फोन करून संपूर्ण परिस्थिती सांगण्यात आली. “आम्ही बाल्कनीत अडकलो आहोत, घरात कुणालाही जागं करता येत नाही,” असं सांगत त्यांनी डिलिव्हरी एजंटला मदतीची विनंती केली.

फोनवरूनच त्या डिलिव्हरी एजंटला घरात ठेवलेल्या स्पेअर किल्लीबद्दल माहिती देण्यात आली. शांतपणे घराचा दरवाजा उघडायचा, कुणालाही न उठवता आत यायचं आणि थेट बाल्कनीकडे यायचं, अशा सूचनाही देण्यात आल्या. विशेष म्हणजे त्या एजंटने अगदी संयमाने आणि काळजीपूर्वक हे सगळं केलं.

व्हिडिओमध्ये दिसतय की डिलिव्हरी एजंट दरवाजा उघडून आत येतो आणि बाल्कनीकडे जातो. त्याला पाहताच मिहीर आणि त्याचे मित्र जोरात हसायला लागतात. सुटका झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.

हा व्हिडिओ मिहीर गहूकरने इंस्टाग्रामवर शेअर केला असून, “पहाटे 3 वाजता स्वतःच्याच बाल्कनीत अडकलो, म्हणून हे केलं,” असं कॅप्शन दिलं आहे. काही तासांतच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

नेटिझन्सनी या घटनेवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. एकाने लिहिलं, “जर पालक उठले असते आणि घरात अनोळखी माणूस दिसला असता, तर काय झालं असतं?” तर Blinkit नेही मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलं, “असं फक्त पुण्यातच होऊ शकतं.” काही लोकांनी स्वतःचे अनुभवही शेअर केले. एका युजरने सांगितलं की, तिने एकदा पतीला उठवण्यासाठी Blinkit डिलिव्हरी बॉयकडून दरवाजा ठोठावून घेतला होता.

या सगळ्यात सर्वाधिक कौतुक झालं ते त्या डिलिव्हरी एजंटचं. अनेकांनी लक्षात आणून दिलं की, तो घरात शिरताना चपला बाहेर काढतो, ही बाबही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. एकूणच, अडचणीतून सुटण्यासाठी केलेली ही हटके युक्ती पुण्याच्या ‘जुगाड’ संस्कृतीचं मजेशीर उदाहरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT