पुणे: महापालिका निवडणुकीला आठ दिवस उलटले, तरीही महापौरपदाच्या निवडणुकीला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करावा, यासाठी मनपाकडून विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात या निवडणुकीसाठी 15 दिवसांच्या अवधीची मागणी केली आहे. त्यानुसार फेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला निवडणूक पार पडली, तर दि. 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकालही जाहीर झाले. मात्र, या महापालिकां मधील महापौरपदाच्या आरक्षण सोडत जाहीर झाल्या नसल्याने महापौरपदाच्या निवडणुका रखडल्या होत्या. गुरुवारी मुंबईत महापौरपदासाठीची आरक्षण सोडत झाली. त्यानुसार पुणे महापालिकेचे महापौरपद महिला खुल्या वर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे आता महापौरपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतात. त्यानुसार महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडून शुक्रवारी विभागीय आयुक्तांना या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी पत्र देण्यात आले. या निवडणुकीसाठी 15 दिवसांच्या अवधीची मागणी करण्यात आली. विभागीय आयुक्त या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभा सात दिवसांत घेण्याची नोटीस काढली जाते. तर अर्ज दाखल करणे, माघारी घेणे आणि निवडणूक यासाठी 3 दिवसांचा कालावधी असतो. उर्वरित पाच दिवस तयारीसाठी लागतात.
दरम्यान, महापालिकेच्या प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने दि. 2 फेबुवारीला ही निवडणूक घेण्याची तयारी केली आहे. मात्र, विभागीय आयुक्तांकडून महापौरपदाच्या निवडणुकीचा अंतिम मुहूर्त निश्चित केला जाणार आहे.
समाज माध्यमातून संभम
राज्यातील महापौर व उपमहापौर निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी समाज माध्यमावर निवडणुकीच्या कार्यक्रमाचे पत्र व्हायरल झाले. त्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दि. 27 व 28 जानेवारी व प्रत्यक्ष निवडणुकीसाठी 30 व 31 जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. मात्र, राज्य शासनाकडून असे कोणतेही पत्र महापालिकेला आले नसल्याचे नगरसचिव योगिता भोसले यांनी सांगितले आहे.
इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी
महापौरपद खुल्या महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याने आता भाजपमधील महिला नगरसेविकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. महापौरपदी कोणाला संधी द्यायची, यासंबंधीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. मात्र, त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांची शिफारस महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्याकडे सध्या इच्छुकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. महापौरपदाच्या स्पर्धेत वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे, मानसी देशपांडे, रंजना टिळेकर, उज्ज्वला जंगले यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.