पुणे: शहरात महापालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईचे पडसाद आता गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत उमटू लागले आहेत. रस्त्यांलगत हातगाड्या, पथाऱ्या आणि स्टॉलवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांकडून शेतमालाची खरेदी कमी झाली आहे.
परिणामी, एरवी पहाटेपासून किरकोळ विक्रेत्यांच्या गर्दीने गजबजणाऱ्या फुले, फळे आणि तरकारी बाजारातील उलाढाल मंदावली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत शेतमालाच्या विक्रीत २० ते ३० टक्क्यांनी घट झाल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदविले. महापालिकेकडून शहराच्या विविध भागांत अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे.
रस्त्यांवर वाहने उभी करून व्यवसाय करणारे विक्रेते, फळांचे स्टॉल, हातगाड्या, पथाऱ्या तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांलगत होणाऱ्या शेतमालाच्या किरकोळ विक्रीवर परिणाम झाला आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम घाऊक बाजारातील मागणीवरही झाला आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डातून शहराच्या विविध भागांतील हजारो किरकोळ विक्रेते दररोज शेतमालाची खरेदी करतात. मात्र, गेल्या काही दिवसांत खरेदीसाठी येणाऱ्या विक्रेत्यांची संख्या रोडावली आहे. बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांकडूनही मर्यादित प्रमाणात मालाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे फुले, फळे आणि भाजीपाल्याला अपेक्षित उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे.
किरकोळ भाजीविक्रेते हा घाऊक तरकारी बाजारातील महत्त्वाचा ग्राहकवर्ग आहे. अतिक्रमण कारवाईदरम्यान माल जप्त झाल्यास आर्थिक नुकसान होण्याच्या शक्यतेने गेल्या काही दिवसांत खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांची संख्या घटली आहे. बाजारात येणारे विक्रेतेही मर्यादित प्रमाणात भाजीपाला खरेदी करत असल्याने घाऊक बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे.-अमोल घुले, अध्यक्ष, श्री शारदा गजानन अडते असोसिएशन.
शहराच्या विविध भागांत हातगाड्यांवर आणि स्टॉलवर फळांची विक्री करणारे व्यावसायिक हे घाऊक फळबाजाराचे नियमित ग्राहक आहेत. मात्र, कारवाईच्या धास्तीने त्यांची खरेदी कमी झाली आहे. माल खरेदी केल्यानंतर तो विकता येईल की नाही, याची चिंता त्यांना सतावत आहे. त्याचा थेट परिणाम फळांच्या विक्रीवर होत आहे.- रोहन उरसळ, अडतदार, मार्केट यार्ड.