पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे शेतमालाची तोड कमी प्रमाणात झाल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक वीस ट्रकने घटली. मागील आठवड्यात झालेली 110 ट्रक आवक रविवारी 90 ट्रकवर आली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी अधिक राहिल्याने टोमॅटो आणि काकडीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
तामिळनाडूपाठोपाठ कर्नाटक येथून तोतापुरी कैरीची आवक सुरू झाली असून, आवक दुपटीने वाढल्याने त्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, राजस्थान येथून गाजर सुमारे 7 ते 8 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून भुईमूग शेंग 2 ते 3 टेम्पो, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाब येथून मटार 15 ते 16 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 टेम्पो, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून तोतापुरी कैरी 3 ते 4 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो, तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाटा 30 ते 35 टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 400 ते 450 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 2 ते 3 टेम्पो, टोमॅटो 6 ते 7 हजार क्रेट, कोबी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळा 2 टेम्पो, गाजर 2 ते 3 टेम्पो, घेवडा 2 ते 3 टेम्पो, पावटा 2 टेम्पो आणि कांद्याची 70 ते 80 टेम्पो इतकी आवक झाली होती.
मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे मेथी, कोथिंबीर, कांदापात, शेपू आणि चवळईच्या भावात वाढ झाली आहे. सर्वाधिक मेथीच्या जुडीच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे 7 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याखालोखाल कोथिंबिरीच्या भावात 5 रुपये, कांदापात 3 रुपये, शेपू 2 रुपये, तर चवळईच्या भावात 1 रुपयाने वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यपाऱ्यांनी दिली. येथील बाजारात मागील रविवारी (दि. 1) कोथिंबिरीची दीड लाख जुडी आवक झाली होती. त्यामध्ये घट होऊन आज 90 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली. तर, मागील आठवड्यात 80 हजार जुडी आवक झालेल्या मेथीची आज 60 हजार जुडी, मागील आठवड्यात 12 हजार जुडी आवक झालेल्या हरभरा गड्डीची आज 7 ते 8 हजार जुडी आवक झाली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे काढणी कमी झाल्यामुळे आवक घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.