शंकर कवडे
पुणे: राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या पावसाचा तडाखा पिकांना बसला आहे. बहुतांश ठिकाणी शेतमालाची तोड रखडली आहे. याखेरीज पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतमालाच्या गाड्या रस्त्यात अडकून पडल्याचा परिणाम गुलटेकडी मार्केट यार्डातील आवकेवर झाला आहे. रविवारी बाजारात अवघ्या 90 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली.
बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने टोमॅटो, फ्लॉवर, ढोबळी मिरची, भुईमूग शेंग आणि मटारच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर, मागणीअभावी भेंडी आणि काकडीच्या भावात घसरण झाली. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक- जावक कायम राहिल्याने त्यांचे दर स्थिर होते.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात येथून हिरवी मिरची ८ ते १० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी २ ते ३, हिमाचल प्रदेश, कर्नाटकातून घेवडा २ टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग शेंग १ टेम्पो, इंदूर येथून गाजर ८ ते ९ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी २ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार २ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे ८ ते १० टेम्पो, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाटा ४० टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ४५० गोणी, भेंडी ३ ते ४ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार क्रेट, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, काकडी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, कोबी ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ६ ते ७ टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा आणि पावटा प्रत्येकी २ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, भुईमूग शेंग ५० ते ६० गोणी, कांदा सुमारे ५० टेम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
कोथिंबीर, मेथी, शेपू आणि पालकची दरवाढ
मागील चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाचा परिणाम पालेभाज्यांच्या आवकेवरही झाला आहे. आवक घटल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू आणि पालक यांच्या दरात जुडीमागे सरासरी पाच रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, बाजारातील मागणी आणि उपलब्ध पुरवठा, यामध्ये समतोल राहिल्याने इतर पालेभाज्यांच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत कोणताही लक्षणीय बदल झाला नाही. रविवारी बाजारात कोथिंबिरीच्या सुमारे ७५ हजार जुड्या, तर मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक झाल्याची माहिती भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली.