Vegetables Pudhari
पुणे

Pune Vegetable Market Prices: भाजीपाल्याची आवक वाढली; गवार, दुधी, काकडीसह दरात 10% घसरण

परराज्यांहून नवीन माल दाखल; कोथिंबीर-पुदिनाचे भाव घसरले, इतर पालेभाज्या स्थिर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यासह परराज्यांतील विविध ठिकाणांहून नवीन मालाची आवक सुरू झाल्याने गवार, दुधी भोपळा, काकडी, फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची, घेवडा आणि तोतापुरी कैरीची आवक वाढू लागली आहे. रविवारी बाजारात मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने या फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक जावक कायम राहिल्याने त्यांचे गतआठवड्यातील दर टिकून होते.

परराज्यातील गाजर आणि मटारचा हंगाम आटोपला असून, मध्य प्रदेशातील लसणाचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात राज्यासह परराज्यांतून शंभर ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक दहा ट्रकने वाढल्याची माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 5 ते 6 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून भुईमूग 3 टेम्पो, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाब येथून मटार 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो, तर इंदौर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 30 ते 35 टेम्पो आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 450 ते 500 गोणी, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेटस, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, , काकडी 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, घेवडा 3 ते 4 टेम्पो, पावटा 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो आणि कांद्याची 175 टेम्पो इतकी आवक झाली.

कोथिंबिर, पुदिना स्वस्त: उर्वरित पालेभाज्या स्थिर

मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर, पुदिना वगळता सर्व पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. आवक वाढल्यामुळे कोथिंबिरीच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे 5 रुपयांनी, तर आवकच्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे पुदिनाच्या भावात 5 रुपयांनी घट झाली आहे. येथील बाजारात रविवारी (दि. 22) कोथिंबिरीची दीड लाख जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत जास्त आहे. मागील आठवड्यात 1 लाख 10 हजार जुडी आवक झाली होती. मेथीची मागील आठवड्यात 70 हजार जुडी आवक झालेली आज 80 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली. आवक वाढली असली तरीही मेथीचे भाव स्थिर आहेत. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात दर्जानुसार 10 ते 15 रुपये भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT