पुणे: शारदीय नवरात्रोत्सवात गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजार बहरल्याने या दहा दिवसांत बाजारात ५२ हून अधिक पाना-फुलांची मोठी विक्री झाली. घटस्थापनेपासून विजयादशमीदरम्यान बाजारात राज्यासह परराज्यातून तब्बल १३ लाख ४३ हजार ५९८ किलो पाना-फुलांची आवक झाली. यामध्ये, केशरी व पिवळ्या झेंडूच्या फुलांची आवक सर्वाधिक राहिली. याद्वारे गेल्या दहा दिवसांत बाजारात तब्बल ८ कोटी ८३ लाख ८३ हजार ८१ रुपयांची रुपयांची उलाढाल झाली.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाली. दसर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह सोलापूर, कोल्हापूर, सातारा तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव येथून झेंडूची आवक झाली. यात नारंगी, पिवळा, कलकत्ता, तुळजापुरी, कापरी आदी झेंडूच्या फुलांचा समावेश होता.
यवत, माळशिरज तसेच नगर भागातील सुपा, पारनेरमधून शेवंती बाजारात दाखल झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फुलांची आवक वाढली. मात्र फुलांची प्रतवारी घसरल्याचे दिसून आले. त्यामुळे, फुलांना अपेक्षित दर मिळाले नसल्याचे अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले.
जुई, कागडा अन् मोगर्याने खाल्ला भाव
देवीला वाहण्यासह केसांमध्ये माळण्यासाठी जुई, मोगरा, कागड्याच्या गजर्यासह गुलछडी व शेंवंतीच्या वेणीच्या खरेदीकडे महिलावर्गाचा कल राहिला. घाऊक बाजारात जुईच्या प्रतिकिलोला सरासरी ८०० रुपये, कागडा ५०० रुपये तर मोगर्याला ६५० रुपये भाव मिळाला, अशी अशी माहिती फुलअडतदार राजेश घोंगडे यांनी दिली.
पावसाने पाठ फिरविल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर्जेदार फुलांची आवक कमी राहिली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या आवकेसह मागणीत वाढ झाली आहे. पाण्याच्या तुटवड्याने जवळपास ८० टक्के मालाच्या प्रतवारीत घसरण झाली आहे. तर, २० टक्के दर्जेदार माल बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे, दर्जेदार फुलांना अधिक दर असून, अन्य फुलांना गतवर्षीच्या तुलनेत कमी दर मिळत आहे.सागर भोसले, फुलांचे व्यापारी, मार्केट यार्ड
गतवर्षीच्या तुलनेत बाजारात फुलांची आवक तब्बल ५१ हजार ४६८ किलोंनी वाढली. मात्र, प्रतवारीअभावी दरात घसरण झाल्याने उलाढालीत ८२ लाख ६८ हजार ५०३ रुपयांची घट झाली आहे. फुलांची आवक वाढलेली दिसत असली तरी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे दरवर्षी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होणाऱ्या झेंडूच्या आवकेत यंदा मोठी घट झाली आहे.संतोष कुंभारकर, विभागप्रमुख, फुलबाजार