Cabbage Cauliflower  Pudhari
पुणे

Pune Market Yard Vegetable Prices: पुणे मार्केट यार्डात कोबी, फ्लॉवरची आवक वाढली; भावात १० ते २० टक्के घसरण

पोषक हवामानामुळे उत्पादन वाढले; मागणी कमी असल्याने दरावर परिणाम, सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: लहरी हवामानामुळे पोषक वातावरण तयार झाल्याने कोबी आणि फ्लॉवरच्या उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात कोबी आणि फ्लॉवरची आवक वाढली आहे.

त्यातुलनेत मागणी कमी राहिल्याने त्याचा भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली. उर्वरित फळभाज्यांची आवक आणि मागणी यामध्ये विशेष बदल नसल्याने त्यांचे दर स्थिर राहिले. रविवारी (दि. २०) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक मार्केट यार्डात झाली.

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, बंगलोर येथुन आले २ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून भुईमूग शेंग ५ टेम्पो, इंदूर येथून गाजर १० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी आणि घेवडा ३ टेम्पो, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, तामिळनाडू येथुन तोतापुरी २५ क्रेट, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे १० टेम्पो, इंदूर, आग्रा येथून बटाटा ४० टेम्पो आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५०० गोणी, भेंडी ५ टेम्पो, कोबी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट्स, काकडी ८ टेम्पो, फ्लॉवर, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, तांबडा भोपळा प्रत्येकी १० टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, मटार ३००, घेवडा, शेवगा आणि पावटा प्रत्येकी सुमारे २ टेम्पो, कांदा सुमारे ८० टेम्पो आवक झाली होती.

पालेभाज्यांचे भाव ‘जैसे थे’

तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक आणि मागणी कायम असल्याने सर्व पालेभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. रविवारी मार्केट यार्डात कोथिंबिरीची सुमारे ३ लाख जुडी, तर मेथीची ६० हजार जुडी आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक एक लाख जुड्यांनी वाढली, तर मेथीची आवक दहा हजार जुड्यांनी घटली. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीला ४ ते १५ रुपये दर मिळाला, तर किरकोळ बाजारात प्रतिजुडी १० ते २५ रुपयांना विकली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT