पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील अडत्यांच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, सध्याच्या संघटनेविरोधात नाराजी वाढल्याने अडत्यांमध्ये उघड फूट पडली आहे. शेतमालाच्या खरेदी-विक्रीदरम्यान शेतकरी व अडतदारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यात सत्ताधारी गट अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत मागील निवडणुकीत प्रमुख विरोधक म्हणून भूमिका बजावणारे अडतदार अमोल घुले यांनी रविवारी (दि. 19) स्वतंत्र संघटनेची घोषणा केली. दरम्यान, निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोणताही अर्ज न आल्याने श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनची निवडणूक बिनविरोध पार पडली.
अडते असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. निवडणुकीपूर्वी दोन्ही गटांमध्ये अध्यक्षपद दीड-दीड वर्षे वाटून घेण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, अध्यक्षपदाची पहिली संधी कोणाला द्यायची, यावर एकमत होऊ शकले नाही. या मतभेदांमुळे अखेर घुले यांनी स्वतंत्र भूमिका घेत ‘श्रीशारदा-गजानन अडते असोसिएशन’ या नव्या संघटनेची घोषणा करीत वेगळी वाट धरली.
परिणामी, सत्ताधारी गटाव्यतिरिक्त अन्य कुणीही निवडणुकीत अर्ज दाखल केला नाही. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. गुलटेकडी मार्केट यार्डातील अडत्यांमध्ये पडलेली ही फूट आगामी काळात बाजारातील निर्णय प्रक्रियेवर आणि शेतकरी आणि अडतदार संबंधांवर काय परिणाम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या संघटनेमुळे अडत्यांच्या प्रश्नांना नवी दिशा मिळणार की संघर्ष अधिक तीव होणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
मार्केट यार्डातील अडत्यांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेत अध्यक्षपद दीड-दीड वर्षे वाटून घेण्याबाबत चर्चा पार पडल्या. सुरुवातीच्या टप्प्यात होकार देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी अखेर शब्द फिरविला. त्यानंतर, अडत्यांच्या बैठकीत नवीन संघटना काढण्याबाबत अडतदारांकडून आग््राह धरण्यात आला. त्यानंतर, अखेर नव्य संघटनेचा निर्णय घेत त्याबाबत घोषणा करण्यात आली.अमोल घुले, अडतदार
अडते असोसिएशनमध्ये कोणतीही फूट नाही. याप्रकरणात नाराज घटकांबरोबर चर्चा सुरू आहे. अडतदार हा आमचाच घटक आहे. त्यांमध्ये काही कारणावरून नाराजी असेल, तर ती दूर करण्यात येईल. अडते असोसिएशनची निवडणूक सुरू असून, रविवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये, विरोधकांकडून एकही अर्ज न आल्याने मार्केट यार्ड विकास पॅनेल बिनविरोध निवडून आले आहे.अनिरुद्ध भोसले, माजी अध्यक्ष, अडते असोसिएशन