Pune Market Yard Workers Protest Pudhari
पुणे

Pune Market Yard Workers Protest: मार्केट यार्डात ५० किलो वजनमर्यादेचा पेच; ५ डिसेंबरपासून बेमुदत बंदचा इशारा

६० ते ७० किलोच्या गोण्या उतरविण्यास कामगारांचा नकार; १ डिसेंबरपर्यंत नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डात परराज्यातून आलेल्या वाटाणा आणि गाजराच्या ६० ते ७० किलो वजनाच्या गोण्या उतरविण्यास कामगारांनी नकार दिल्याने रविवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाला. यावरून कामगार, अडते आणि व्यापारी आमने-सामने आले. अखेर चर्चेनंतर संबंधित गोण्यांमधील माल उतरविण्यात आला.

मात्र, १ डिसेंबरपर्यंत गोण्यांचे वजन ५० किलोच्या मर्यादेत न आणल्यास ५ डिसेंबरपासून संपूर्ण मार्केट यार्ड बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियनचे अध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे यांनी दिला आहे. कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने शेतीमालाच्या गोण्यांचे वजन ५० किलोच्या मर्यादेत ठेवण्याबाबत केंद्र व राज्य सरकार, कामगार आयुक्त कार्यालय तसेच बाजार समितीने यापूर्वी अनेकदा परिपत्रके काढली आहेत.

कामगार संघटनांनी केलेल्या जनजागृतीलाही शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, तरकारी आणि कांदा-बटाटा विभागात पुन्हा जादा वजनाच्या गोण्या येऊ लागल्या असून, त्यात परराज्यातील मालाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि अडत्यांनी वजनमर्यादेचे काटेकोर पालन करावे. कामगारांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे नांगरे यांनी स्पष्ट केले.

न्यायालयीन आदेश असूनही अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाच्या अनुषंगाने ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांबाबत शासनाने विविध आदेश आणि परिपत्रके काढले आहे. मात्र, त्यानंतरही बाजारात अतिवजनाच्या गोण्यांमधून शेतीमाल येत असल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. नियमांच्या अंमलबजावणीसाठी वारंवार पाठपुरावा आणि आंदोलने करूनही प्रश्न कायम असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासनांवर न थांबता वजनमर्यादेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.

अतिवजनाच्या गोण्यांमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात

मार्केट यार्डात दररोज ६० ते ७० किलो किंवा त्याहून अधिक वजनाच्या गोण्या उचलाव्या लागत असल्याने हमालांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. सतत जड ओझे उचलल्यामुळे मणक्याचे, मानेचे आणि गुडघ्यांचे आजार वाढत आहेत. काही कामगारांना शारीरिक व्याधींमुळे काम सोडण्याची वेळ येत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे कामगारांचे आरोग्य जपण्यासाठी ५० किलो वजनमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT