

पुणे: मृद व जलसंधारण विभागाच्या दि. २७ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयापूर्वी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेली मृद व जलसंधारणविषयक कामांमध्ये सलग समतल चर, खोल सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडींग, ढाळीचे बांध, शेततळे आदी क्षेत्र उपचार आणि अनघड दगडी बांध, अर्दन स्ट्रक्चर, माती नाला बांध आदी ओघळ नियंत्रण उपचाराचा समावेश आहे. ही मृद व जलसंधारणविषयक कामे येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी म्हणजेच दि. ३० जून २०२७ पर्यंत कृषी विभागामार्फत राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
कृषी विभागाला अशी कामे करण्यास मृद व जलसंधारणने विभागानेच २७ मेच्या शासन निर्णयाने खोडा घातला होता. या विषयी ‘ऐन दुष्काळात कृषी विभागाची वनराई बंधाऱ्यांची मोहीमच थंडावली’ अशा आशयाचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रकाशित करून या विषयाला वाचा फोडली होती.
जलसंधारणाची कामे कृषी विभागाने नाही तर मृद व जलसंधारण विभागामार्फत करण्यात येतील, असा फतवाच काढल्यामुळे इच्छा असूनही कृषी विभागाला काहीच करता येत नव्हते. मात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभाग दोन पावले मागे आल्याचे बोलले जाते. तसेच, वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनीही साखळी पद्धतीने वनराई बंधारे अभियान मिशन मोडवर राबवण्याची मागणी शासनाकडे केली होती.
दि. १९ नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार मृद व जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांशी थेट संपर्क व समन्वय असलेल्या तसेच अशा कामांचा पूर्वानुभव असलेल्या कृषी विभागामार्फत काही मृद व जलसंधारणविषयक कामे करावीत, असे म्हटले आहे. त्यामुळे एक प्रकारे कृषी विभागाच्या कामावरच मृद व जलसंधारण विभागाने शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे वनराई बंधाऱ्यांसह क्षेत्र उपचार आणि ओघळ नियंत्रण उपचाराचा मार्ग मोकळा झाल्याने त्याचा भविष्यात शेती आणि शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना शासनाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीने निर्णय घेऊन मृद व जलसंधारणाची कामे कृषी विभागामार्फत करण्यास मान्यता दिल्याचे म्हटले आहे.