Pulses Pudhari
पुणे

Pune Market Rates: पुण्यात डाळी महागल्या; साखर, गुळाच्या दरातही वाढ

पावसाच्या खंडामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील आवक घटली; नवरात्रोत्सवामुळे साबुदाणा, भगर, शेंगदाण्याला मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पावसाने ओढ दिल्याने उत्पादन क्षेत्रातून गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात होणाऱ्या शेतमालाच्या आवकेवर परिणाम झाला आहे. मसूर वगळता अन्य डाळींच्या दरात सलग तिसऱ्या आठवड्यात किलोमागे पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात तूरडाळ प्रतिक्विंटल १० हजार ते १५ हजार २०० रुपये, हरभराडाळ ९ हजार २०० ते ९ हजार ६०० रुपये, मूगडाळ ११ हजार ते ११ हजार ५०० रुपये, तर उडीदडाळ ११ हजार ते १४ हजार रुपये दराने विकली जात आहे. मसूरडाळीचे दर ७ हजार ६०० ते ७ हजार ८०० रुपयांवर स्थिर आहेत.

शारदीय नवरात्रोत्सवामुळे साखर, गूळ, साबुदाणा, भगर, शेंगदाणा आणि नारळाला मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे साखरेच्या दरात किलोमागे पाच रुपये, तर गुळाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. साखरेला प्रतिक्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपये, तर गुळाला दर्जानुसार ४ हजार ५०० ते ५ हजार २०० रुपये दर मिळत आहे.

साबुदाणा प्रतिक्विंटल ७ हजार ७०० ते ८ हजार ५०० रुपये, वरई भगर २१ हजार ते २३ हजार रुपये, सावा भगर १९ हजार ५०० ते २० हजार ५०० रुपये, तर शेंगदाण्याला ११ हजार ते १४ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. या जिनसांचे दर आधीच तेजीत असल्याने गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

पावसाअभावी ज्वारी, बाजरी आणि कोलम तांदळाची आवकही घटली आहे. त्यामुळे ज्वारी आणि कोलम तांदळाच्या दरात किलोमागे दोन ते तीन रुपये, तर बाजरीच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात गावरान ज्वारीला प्रतिक्विंटल ५ हजार ६०० ते ७ हजार ८०० रुपये, बाजरीला ३ हजार ते ३ हजार ८०० रुपये, तर एचएमटी कोलम तांदळाला ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये दर मिळत आहे.

कोलम वगळता बासमतीसह अन्य तांदळांचे दर स्थिर आहेत. नवरात्रोत्सवामुळे भुसार बाजारात ग्राहक आणि व्यापाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारातील उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मागणी आणि पुरवठ्यात समतोल असल्याने खाद्यतेल, रवा, आटा, मैदा, पोहे आणि लाल मिरचीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT