Pune APMC Pudhari
पुणे

Pune Market Committee Secretary: पुणे बाजार समितीच्या सचिवपदावर कनिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती; पणन विभागाच्या निर्णयावर सहकार विभागात नाराजी

अपर निबंधक दर्जाचे पद असताना उपनिबंधकांकडे पदभार; नागपूर बाजार समितीचे सचिव दिनेशकुमार चंदेल यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्याच्या सहकार विभागातील प्रतिनियुक्तीने नियुक्त होणाऱ्या पणन विभागातील बदल्यांना कोलदांडा मारला जात असून, वरिष्ठ पदांवरील मंजूर असलेल्या अपर निबंधकांसह सहकार उपनिबंधकांचाही पुण्यात तुटवडा असल्याचे चित्र पणन विभागाने निर्माण केले आहे. कारण पुणे बाजार समितीचे सचिवपद हे सहकार अपर निबंधक दर्जाचे असताना राजरोसपणे उपनिबंधकांकडे पदभार देऊन काम हाकले जात आहे. त्यातच पुणे बाजार समितीच्या सचिवपदाचा अतिरिक्त पदभार चक्क नागपूर बाजार समितीचे सचिव असलेले दिनेशकुमार चंदेल यांच्याकडे देण्याचे आदेश शासनाने काढले आहेत.

वरिष्ठ सहकार अधिकाऱ्यांचे मंजूर पद असतानाही पणन विभागाकडून मनमानी पद्धतीने सहकार विभागातील कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे पदभार सोपविला जात आहे. त्यामुळे पणनच्या या पवित्र्यावर सहकार विभागात उघडपणे ओरड आणि नाराजी सुरू झाली आहे. त्याचे पुणे बाजार समितीचे सचिवपद हे उत्तम उदाहरण असल्याची चर्चा बुधवारी (दि. 30) आलेल्या आदेशावर सुरू झाली आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व सहकार उपनिबंधक राजाराम धोंडकर यांची या पदावरून उपनिबंधक आर/एन मुंबई या पदावर नियमित बदली करण्यात आलेली आहे. शिवाय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील धोंडकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या पदावरही अपर निबंधक दर्जाचे अधिकारी काम करत आले आहेत.

दरम्यान, पुणे बाजार समितीच्या सचिवपदाच्या धोंडकर यांच्या बदलीने रिक्त जागी चंदेल यांची नियुक्ती झाली आहे. वास्तविकतः नागपूर आणि पुणे हे अंतर पाहता चंदेल यांचीच नियुक्ती का? सहकार आयुक्तालयाचे मुख्यालय असलेल्या पुण्यात बाजार समितीवर मंजूर असलेल्या अपर निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा तोटा आहे काय? उपनिबंधक पदावरील कनिष्ठ व मर्जीतील अधिकारी आणून आणि प्रत्यक्षात दोन टोकाच्या शहरांचा पदभार देऊन नेमके त्या पदाच्या कामाला ते न्याय देणार कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे एकूणच पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या आशीर्वादाने मर्जीतील सहकार उपनिबंधकांची ''चलती'' जोमात सुरू झाल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सहकार अधिकारी राजपत्रित संघटनेची भूमिका अशा निर्णयात पुढेच येत नसल्याने संघटनेचे अस्तित्व आहे की नाही? असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT