शंकर कवडे
पुणे: राज्यासह शहरात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप तो सक्रिय न झाल्याने पुणेकरांचा आंबा खरेदीकडील ओढा कायम आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा आणि कर्नाटकनंतर आता आंध्र प्रदेशासह उत्तर प्रदेशातील आंब्यानी बाजार गाजवण्यास सुरुवात केली आहे. आंध्र प्रदेशातील नीलम, तोतापुरी आणि बदाम आणि उत्तर प्रदेशातील दशहरी, लंगडा आणि चौसा या लोकप्रिय जातीही पुण्याच्या बाजारात दाखल झाल्याने आंबाप्रेमींना दक्षिण ते उत्तर भारतातील विविध चवींचा आस्वाद घेण्याची संधी मिळत आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात आंध्र प्रदेशातील श्रीनिवासपूर, तर उत्तर प्रदेशातील सहारंगपूर, बिजनौर, देहराडून, मेरठ, लखनऊ, मलियाबाद, मुरादाबादमधून आंबा दाखल होऊ लागला आहे. आंध्र प्रदेशातून जवळपास दहा टन, तर उत्तर प्रदेशातून 20 ते 22 क्रेटसच्या नऊ आणि पाच ते आठ किलो बॉक्सच्या पाच गाड्यांची आवक होत आहे, तर उत्तर प्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आंब्यांचा दर्जा आणि प्रतवारी चांगली असल्याने ग्राहकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही प्रदेशांतील आंब्याचा हा हंगाम जुलैअखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आंध्र प्रदेशातील आंब्याचे अडतदार रोहन उरसळ आणि उत्तर प्रदेशातील आंब्याचे अडतदार सत्यजित झेंडे यांनी दिली.
दशहरी
उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लागवड; दशहरी गावाच्या नावावरून आंब्याला नाव मिळाले.
आकाराने उभट व निमुळता तसेच गर गडद केसरी रंगाचा आणि चवीला अत्यंत गोड असतो.
दरवर्षी १० ते १५ जूनदरम्यान आवक सुरू; हंगाम साधारण दीड ते पावणेदोन महिने चालतो.
घाऊक दर (२० ते २२ किलो क्रेटस) : 800 ते 1200. (5 ते 7 किलो पेटी) ४०० ते ६०० रुपये.
किरकोळ दर (प्रतिकिलो) 70 ते 90 रुपये
लंगडा
काशी आणि वाराणसी परिसरात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
जून ते जुलैदरम्यान बाजारात; हंगाम साधारण दीड ते पावणेदोन महिने चालतो.
आकाराने गोलसर आणि पिकल्यानंतरही या आंब्याचा रंग हिरवा-पिवळाच राहतो.
याचा गर पिवळसर रंगाचा असून, चवीला गोड आणि रसाळ असतो.
घाऊक दर (२० ते २२ किलो क्रेटस) : 800 ते 1200. (5 ते 7 किलो पेटी) ४०० ते ६०० रुपये.
किरकोळ दर (प्रतिकिलो) 70 ते 90 रुपये
चौसा
गोलसर आणि उभट तसेच दशहरी, लंगडापेक्षा अधिक गोड आणि रसदार मानला जातो.
जुलै महिन्यापासून आवकला सुरुवात; हंगाम साधारण एक महिना चालतो.
बिहार आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांमध्ये या आंब्याला विशेष पसंती आहे.
भडक पिवळ्या रंगामुळे हा आंबा सहज ओळखला जातो.
उत्तर प्रदेशातील हरदोईचा चौसा आंबा विशेष प्रसिद्ध आहे.
बाजारातील घाऊक दर (२० ते २२ किलो क्रेटस्) : 15०० ते 18०० रुपये.
किरकोळ दर (प्रतिकिलो) 100 ते 120 रुपये
तोतापुरी
पोपटाच्या चोचीसारखा आकार असल्यामुळे याला तोतापुरी हे नाव पडले आहे.
आकाराने मोठा व लांबट तसेच हिरवा असलेला हा आंबा चव आंबट-गोड अन्य आंब्याच्या तुलनेत कमी गोड असतो.
कच्च्या तोतापुरीचा वापर चटणी, लोणचे आणि पन्हे तयार करण्यासाठी केला जातो.
व्यावसायिक वापरासाठी हा विशेष लोकप्रिय असून, प्रक्रिया उद्योगांमध्ये मोठी मागणी असते.
घाऊक दर (प्रतिकिलो) 20 ते 30 रुपये. किरकोळ दर (प्रतिकिलो) 40 ते 50 रुपये.
नीलम
'नीलम' हे नाव नीलम नदीच्या परिसराशी संबंधित मानले जाते.
इतर आंब्यांच्या तुलनेत हा आंबा अधिक गोड आणि सुगंधी असतो.
आकाराने लहान तसेच पिकल्यावर याचा रंग नारंगी-पिवळसर दिसतो.
आकर्षक सुगंध आणि चव यामुळे ग्राहकांमध्ये मोठी मागणी असते.
उशिरा हंगामात उपलब्ध होणाऱ्या आंब्यांपैकी हा एक मानला जातो.
घाऊक दर (प्रतिकिलो) 30 ते 40 रुपये. किरकोळ दर (प्रतिकिलो) 50 ते 60 रुपये.
बदाम
लांबट व किंचित चपटा असून, पिकल्यानंतर त्याची साल पिवळसर-सोनेरी रंगाची होते.
चव अतिशय गोड व सुगंधी असून, गर मऊ, रसाळ आणि जवळपास तंतुविरहित असतो.
गडद पिवळ्या रंगाचा रसाळ गर खाण्यास तसेच रसासाठी उत्तम मानला जातो.
हा आंबा साधारणपणे एप्रिल ते जुलैदरम्यान बाजारात उपलब्ध असतो.
घाऊक दर (प्रतिकिलो) 25 ते 35 रुपये. किरकोळ दर (प्रतिकिलो) 45 ते 55 रुपये.