Mango Festival Illegal Vendors Pudhari
पुणे

Pune Mango Festival Illegal Vendors: मार्केट यार्डात ‘आंबा महोत्सवा’बाहेर अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट

कर्नाटक आंबे ‘हापूस’ म्हणून विक्री; ग्राहकांची फसवणूक, कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मार्केट यार्डात राज्य कृषी पणन मंडळाच्या आंबा महोत्सव केंद्राबाहेर गेटच्या दुतर्फा रस्त्यावर अनधिकृत किरकोळ विक्रेत्यांचा सुळसुळाट होऊन प्रति आंबा महोत्सवच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकातील आंब्यांची कोकण हापूस म्हणून उघडपणे विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे पणन मंडळाच्या रक्षकाला हे विक्रेते भीकसुद्धा घालत नाहीत.

परिणामी, ग््रााहकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अनधिकृत आंबा विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्याची मागणी महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते यंदाच्या रौप्यमहोत्सवी आंबा महोत्सवाचे उद्घाटन गेल्याच आठवड्यात झाले. त्या वेळी व्यासपीठावर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप व अन्य अधिकारी उपस्थित होते. पणनच्या आंबा महोत्सवाला सर्वतोपरी बाजार समितीचे सहकार्य राहील, असे आश्वासनही जगताप यांनी मंत्र्यांसमोरच दिलेले आहे. शनिवारी या महोत्सवाला भेट दिली असता, गेटबाहेर दुतर्फा अनधिकृत विक्रेत्यांनी उघडपणे आंबा विक्री करून शेतकऱ्यांच्या मालविक्रीस चुकीची व अनधिकृत स्पर्धा निर्माण केलेली आहे.

कोकणातील हापूसच्या नावाखाली सर्रास कर्नाटक आंबा ग््रााहकांच्या गळ्यात मारण्याचा प्रकार सुरू आहे. वास्तविक या रस्त्यावर आंबा महोत्सवाबाहेरच अशी विक्री करण्याचे धाडसच कसे होते? मार्केट कमिटीकडून सुरक्षा रक्षकांवर लाखोंचा खर्च केला जात असताना, अनधिकृत विक्रेते हटविण्याबाबत कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली. याबाबत प्रशासनाचे प्रमुख असलेले बाजार समितीचे सचिव व सहकारचे उपनिबंधक राजाराम धोंडकर यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

पणन मंडळाच्या आंबा महोत्सवाला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नेहमीच सहकार्य लाभले असून, ते यापुढेही कायम राहील. शेवटी उत्पादक शेतकरी स्वतः आंबा विक्री करीत असून, खात्रीशीर माल पुणेकर ग््रााहकांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे पणनमंत्री जयकुमार रावल यांनीही पणन मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. हा महोत्सव सुरळीत चालण्यासाठी वखार महामंडळ रस्त्यावर होणाऱ्या अनधिकृत शेतमाल विक्रीबाबत पुढील दोन दिवसांत कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देत आहे.
प्रकाश जगताप, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT