

दत्तात्रय नलावडे
वेल्हे: जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या अतिवृष्टीच्या राजगड तालुक्यात उन्हाच्या वाढत्या तीवतेबरोबर पाणीटंचाईच्या झळा वाढल्या आहेत. वाजेघर, वांगणीवाडी, मेटपिलावरेसह पानशेत, राजगड, तोरणा भागातील 12 वाड्या-वस्त्या आणि गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहिरी, पाणी योजना, नवीन पाणी योजना राबविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने साडेपाच कोटी रुपये खर्चाचा टंचाई आराखडा (प्रस्ताव) तयार केला आहे. प्रशासनाने पाणीटंचाईग््रास्त वाड्या-वस्त्या तसेच गावांतील पाणीसाठे ताब्यात घेऊन ते पाणी टंचाईग््रास्त रहिवाशांना देण्याचे नियोजन केले आहे.
तोरणा गडाच्या पायथ्याच्या अतिदुर्गम मेटपिलावरे येथे गुंजवणी धरणावरून थेट पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पाणी जुन्या टाकीत टाकले जात आहे. टाकी गळत असल्याने रहिवाशांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. स्थानिक रहिवासी विशाल पिलावरे म्हणाले, दोन दिवसांतून एकदा रात्री टाकीत पाणी सोडले जाते. टाकी गळत असल्याने सकाळी अर्धीच टाकी असते, त्यामुळे रहिवाशांना अपुरे पाणी मिळत आहे. पाण्यासाठी जनावरे माणसांना वणवण भटकावे लागत आहे.
वाजेघर खुर्द येथील बाळासाहेब भरम म्हणाले, नळाला दिवसाआड पाणी येत आहे. कडक उन्हामुळे जनावरे तसेच माणसांची तहान भागत नाही. त्यामुळे मिळेल तेथून डोक्यावर वाहून महिला आणि मुली पाणी आणतात.
राजगड, पानशेत धरण भागातील सहा गावांत तसेच वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी जवळील खासगी विहिरी, कूपनलिका, पाणवठे ताब्यात घेतले जाणार आहेत. पंपिंग करून ताब्यात घेतलेल्या पाणवठ्यातील पाणी सार्वजनिक विहिरी, टाक्यांत सोडले जाणार आहे. यासाठी तहसीलदार निवास ढाणे यांच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा विभाग प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करणार आहे.
संजय ढमाळ, गटविकास अधिकारी, राजगड पंचायत समिती
तालुक्यातील 40 टंचाईग््रास्त गावे तसेच वाड्या-वस्त्यांमध्ये विहिरी, टाक्या, जलवाहिन्या, पाणी योजनांची दुरुस्ती तसेच नवीन पाणी योजना राबविण्यासाठी साडेपाच कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर कामे सुरू होणार आहेत.
श्रीरंग गडदे, उपविभागीय अभियंता, राजगड पाणीपुरवठा विभाग