पुणे: दसरा व दिवाळीमुळे मागे पडलेली महावितरणची वीजबिल वसुलीची मोहीम नोव्हेंबर महिन्यात तीव्र करण्यात आली आहे. पुणे परिमंडलात अकृषी ग्राहकांकडे तब्बल 436 कोटी रुपये थकले आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने उपविभागनिहाय पथके तयार केली असून, प्रत्येक कर्मचार्याला वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. वीज ग्राहकांनीही त्यांच्याकडील थकबाकी चालू वीजबिलासह भरून सहकार्य करावे आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण पुणे परिमंडलात महावितरणचे 38 लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. त्यापैकी 8 लाख 44 हजार 381 ग्राहक थकबाकीत आहेत. त्यांच्याकडे 436 कोटी 49 लाख रुपये इतकी रक्कम थकली आहे. उत्सव काळात महावितरणने ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता वसुलीवर जोर दिला होता. मात्र, तरीही अनेक ग्राहकांनी वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी थकबाकीत वाढ झाली. 6 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, पुणे ग्रामीण मंडलात 2 लाख 76 हजार 943 ग्राहकांकडे 262 कोटी, गणेशखिंड शहर मंडलात 2 लाख 74 हजार 306 ग्राहकांकडे 90 कोटी 44 लाख तर रास्ता पेठ शहर मंडलातील 2 लाख 93 हजार 132 ग्राहकांकडे 84 कोटी 3 लाख रुपये थकले आहेत.
वर्गवारीनिहाय घरगुती 7 लाख 12 हजार 622 ग्राहकांकडे 162 कोटी 61 लाख, वाणिज्यिक 1लाख 3 हजार 966 ग्राहकांकडे 64 कोटी 17 लाख, लघुदाब औद्योगिक 14 हजार 685 ग्राहकांकडे 27 कोटी 41 लाख, पथदिवे 4857 ग्राहकांकडे 92 कोटी 65 लाख, पाणीपुरवठा 1947 ग्राहकांकडे 78 कोटी 69 लाख, सार्वजनिक सेवा 4673 ग्राहकांकडे 9 कोटी 75 लाख तर इतर वर्गवारीतील 1631 ग्राहकांकडे 1 कोटी 18 लाख रुपये इतकी थकबाकी आहे.
वीज तोडल्यास पुनर्जोडणी शुल्क भरावे लागणार
थकबाकीदार ग्राहकांनी वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकी रक्कम विनाविलंब भरून सहकार्य करावे. थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास थकबाकीसह पुनर्जोडणी आकार भरावा लागतो. सिंगल फेजसाठी 310 रुपये तर थ्री फेजसाठी 520 रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक आहे.
वीजबिल भरण्यासाठी पर्याय
वीजबिल भरण्यासाठी महावितरणने अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह ऑनलाइनचे अनेक पर्याय दिले आहेत. यामध्ये वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन करून वीजबिल भरता येते. महावितरण मोबाईल अॅप , संकेतस्थळ, भीम, फोन पे, गुगल पे, पेटीएम आदी युपीआय अॅपचा वापर करून घरबसल्या ऑनलाइन वीजबिल भरता येते. वेळेत ऑनलाइन वीजबिल भरल्यास वीज बिलावर सूटदेखील मिळते.
पुणे परिमंडलातील सर्व वीज ग्राहकांनी आपले वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे आणि संभाव्य गैरसोय व दंड टाळावा.सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण, पुणे परिमंडल