Mahatma Phule Wada Pudhari
पुणे

Pune Heritage Memorial Project Delay: पुण्यात महात्मा फुले वाडा–सावित्रीबाई फुले स्मारक प्रकल्प रखडला

कोट्यवधींचा निधी उपलब्ध असूनही भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या अडथळ्यांमुळे विस्तारीकरण प्रकल्प कागदावरच अडकला आहे

पुढारी वृत्तसेवा

निनाद देशमुख

पुणे: मोजणी झाली, नकाशे तयार झाले, 11 कोटींची भरपाई जमा झाली, शासनाने 200 कोटींची तरतूददेखील उपलब्ध करून दिली, त्यातील 100 कोटी वर्ग करूनही महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा बहुचर्चित एकत्रीकरण व विस्तारीकरण प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी विशेष उपायुक्तांची देखील नेमणूक केली आहे. तरीसुद्धा भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. प्रशासन याबाबत नुसत्या बैठका घेत आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जपण्याचा महत्त्वाचा उपक्रम कागदावरच अडकून पडला आहे.

महापालिकेने महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला व स्मृतींना उजाळा देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली होती. यासाठी येथील जागा ताब्यात घेण्यासाठी देखील प्रशासनाने मंजुरी दिली होती. स्मारकासाठी गंज पेठेतील 5 हजार 310 चौ. मी. क्षेत्र या प्रकल्पासाठी आरक्षित करण्यात आले आहे. तब्बल 516 मालक आणि 285 भाडेकरू यांचा यात समावेश आहे.

फेबुवारी 2024 मध्ये राज्य शासनाने अधिसूचना काढून मंजुरी मिळालेला हा प्रकल्प अजूनही भूसंपादनाच्या टप्प्यातच अडकलेला आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या 36.70 कोटींपैकी 30 टक्के रक्कम म्हणजेच 11 कोटी रुपये जुलै 2025 मध्येच विशेष भूमि संपादन अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले. संयुक्त मोजणीसाठी सुमारे 14 लाख रुपये खर्च करण्यात आले. मोजणी पूर्ण होऊन नकाशे आणि विवरणपत्र तयार झाले असून, ते संबंधित अधिकाऱ्यांकडे सादरही करण्यात आले आहेत. मात्र, या सर्व प्रक्रियेनंतरही पुढील टप्प्याचा निर्णय होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा ठरला आहे, तो पुनर्वसनाचा. येथे भाडेकरूंची संख्या मोठी असल्याने त्यांचे पुनर्वसन कसे करायचे, याबाबत महापालिका प्रशासन अद्याप ठोस धोरण ठरवू शकलेले नाही. वारंवार बैठका, चर्चा आणि कागदी हालचाली यापलीकडे कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही. विशेषत: प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता नसताना केवळ इच्छाशक्तीचा अभाव आणि विभागांतील समन्वयाचा अभाव यामुळे प्रकल्प रखडल्याची टीका आता उघडपणे होत आहे. 100 कोटींची तरतूद असूनही प्रत्यक्षात कामाचा वेग शून्य असल्याने पालिका प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या वर्षी मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्पाच्या संथगतीवर तीव नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्या इशाऱ्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस गती दाखवलेली नाही. यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.

भूसंपादनानंतरच स्मारकाच्या कामाला मिळणार वेग!

समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आणि पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे गंज पेठेतील फुले वाडा येथे वास्तव्य होते. हा परिसर ‌‘समता भूमी‌’ म्हणून ओळखला जातो. या परिसरातील फुले वाडा राज्य शासनाच्या हेरिटेज विभागाच्या ताब्यात आहे. महापालिकेच्या वतीने याच परिसरात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक तयार करण्यात आले आहे. या स्मारकांना वर्षभर राष्ट्रीय नेते आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती भेटी देतात. समता भूमीचे विस्तारीकरण करण्याचा आणि फुले वाडा-सावित्रीबाई फुले स्मारक जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक यांच्यामध्ये अंदाजे शंभर मीटरचे अंतर आहे. मात्र, फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या आसपास झोपडपट्टी व दाट लोकवस्ती आहे. दोन्ही वास्तू जोडण्यासाठी महापालिकेला या घरांचे स्थलांतर करून भूसंपादन करावे लागणार आहे. हे भूसंपादन झाल्यानंतर दोन वास्तू जोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

त्याच परिसरात घरे देण्याचा बाधितांचा आग््राह

5 हजार 310 चौ.मी. क्षेत्र या प्रकल्पासाठी आरक्षित करण्यात आले आहे. तब्बल 516 मालक आणि 285 भाडेकरू यांचा यात समावेश आहे. घरमालकांना शहरात इतर ठिकाणी जागा देण्याबाबत चर्चा सुरू होती, तर भाडेकरूंना भाडेपट्‌‍ट्यावर इतरत्र घरे दिली जाणार आहेत. मात्र, घरमालकांनी याच परिसरात घरे मिळावीत, असा आग््राह धरल्याने भूसंपादन प्रक्रिया आणखी लांबली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात यासंदर्भात बैठक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT