Attack Pudhari
पुणे

Pune Attack Case: पुण्यात हॉटेल वादातून धारदार शस्त्राने हल्ला; दोघे गंभीर जखमी

महर्षीनगर परिसरात भरदिवसा हल्ला; एका व्यक्तीचे मनगट तुटले, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: खाद्यपदार्थ व्यवसायातील स्पर्धेतून हॉटेलचालकासह दोघांवर धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना महर्षीनगर भागात घडली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात एकाचे मनगट तुटून वेगळे झाले. भरदिवसा दोघांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर परिसरात भीती पसरली.

किशोर राजू बनसोडे (वय 29), प्रसाद राजेंद्र आजुरे (वय 28, दोघे रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. यातील किशोर याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत सुनील राजू बनसोडे (वय 26) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पोम्मीराजा मुथ्थुराज थेवर (वय 24, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) याच्यासह चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोडे यांचे महर्षीनगर परिसरात व्यंकटेश्वरा अमृततुल्य आणि व्यंकटेश्वरा वडेवाले उपाहारगृह आहे. आरोपी थेवर हा बनसोडे यांच्या उपाहारगृहासमोर दाक्षिणात्य खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावायचा. बनसोडे आणि थेवर यांच्यात व्यवसायावरून वाद झाले होते. थेवर हा बनसोडे यांच्या उपाहारगृहासमोर गाडी लावत होता. त्यामुळे बनसोडे यांनी त्याला गाडी लावू नको, असे सांगितले होते.

या कारणावरून थेवर आणि बनसोडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. शनिवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास किशोर बनसोडे आणि प्रसाद आजुरे उपाहारगृहात होते. आरोपी थेवर आणि त्याच्याबरोबर तीन साथीदार तेथे आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे, तसेच दांडके होते. वादातून आरोपींनी बनसोडे आणि आजुरे यांच्यावर शस्त्राने वार करण्यास सुुरुवात केली. आजुरे याने वार हातावर झेलला. त्याचे मनगट तुटले.

या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरदिवसा दोघांवर हल्ला झाल्यानंतर महर्षीनगर परिसरात घबराट उडाली. बनसोडे आणि आजुरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, सहायक निरीक्षक अभिजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT