Air Pollution  Pudhari
पुणे

Pune Low Emission Zone: पुण्यात ‘लो इमिशन झोन’चा विचार; शिवाजीनगर-पेठ भागात जुन्या वाहनांवर प्रदूषण शुल्क

वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रणासाठी प्रशासनाची तयारी; बीएस-3 वाहनांवर दररोज शुल्काचा प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजीनगरसह पेठ परिसरात ‌‘लो इमिशन झोन‌’ (कमी उत्सर्जन क्षेत्र) लागू करण्याबाबत प्रशासनाकडून विचारमंथन सुरू आहे. या क्षेत्रात जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रवेशासाठी विशेष प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध तज्ज्ञ संस्था, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि वाहतूक नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

पदपथांना चालण्यायोग्य करणार...

बैठकीत जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच शहरातील पदपथ अधिक चालण्यायोग्य करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे, बससेवा वाढविणे तसेच नागरिकांना स्वच्छ व पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे यांसारख्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

स्वच्छ हवा मिळाली पाहिजे...

स्वच्छ हवा आणि आरोग्यदायी शहर निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार असून, याबाबत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडून सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

अतिसूक्ष्म धूलिकण 2.5 चे प्रमाण वाढले...

पुणे शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमुख कारण वाहने असल्याचे विविध अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे. 2020 मध्ये झालेल्या अभ्यासानुसार पुणे महानगर परिसरातील अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) प्रमाण आहे. एकूण प्रदूषणापैकी सुमारे 46 टक्के प्रदूषण वाहनांमुळे होत असल्याचे आढळून आले आहे. हे सूक्ष्म कण मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरतात.

जुन्या वाहनांची संख्या जास्त...

सन 2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील पेट्रोल, डिझेल व सीएनजीवर चालणाऱ्या सुमारे 70 टक्के वाहनांमध्ये ‌‘भारत स्टेज-4‌’ किंवा त्यापेक्षा जुने इंजिन तंत्रज्ञान असल्याचे आढळून आले आहे. केंद्र शासनाने वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‌‘भारत स्टेज‌’ उत्सर्जन मानके लागू केली असून, सध्या ‌‘भारत स्टेज-6‌’ हे तुलनेने सर्वांत कमी प्रदूषण करणारे इंजिन तंत्रज्ञान मानले जाते.

जुनी कार करते जास्त प्रदूषण...

अभ्यासानुसार, सन 2000 पूर्वी नोंदणी झालेली एक कार जवळपास 11 आधुनिक ‌‘भारत स्टेज-6‌’ कारइतके प्रदूषण करते, तर जुन्या तंत्रज्ञानाच्या एका ट्रकमुळे सुमारे 14 आधुनिक ट्रकइतके प्रदूषण होते. तसेच, ‌‘भारत स्टेज-6‌’ डिझेल कारमधून होणारे सूक्ष्म कणांचे उत्सर्जन ‌‘भारत स्टेज-3‌’ डिझेल कारपेक्षा सुमारे 90 टक्के कमी असल्याचेही नमूद करण्यात आले.

...तर जुन्या वाहनांना दररोज भरावे लागणार प्रदूषण शुल्क

शिवाजीनगर व पेठ परिसरात ‌‘लो इमिशन झोन‌’ लागू करण्याचा विचार आहे. या क्षेत्रात ‌‘बीएस 3‌’ किंवा त्यापेक्षा जुन्या इंजिनच्या वाहनांना प्रवेशासाठी दररोज प्रदूषण शुल्क आकारले जाऊ शकते. संबंधित शुल्क आगाऊ भरले नसल्यास वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात ही अट ‌‘भारत स्टेज-4‌’ वाहनांनाही लागू करण्याचा तसेच लो इमिशन झोनचा विस्तार इतर भागांत करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. ही अंमलबजावणी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT