Notice Pudhari
पुणे

Pune Love Jihad Notice Controversy: पुण्यात ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावरून महापालिकेत खळबळ

पीडित कुटुंबाला नोटीस; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, चौकशीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: लव्ह जिहादप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असताना महापालिका प्रशासनाने पीडितेच्या वडिलांना त्यांच्या घराच्या अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली. या प्रकरणाचे तीव पडसाद सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.

भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक धीरज घाटे यांनी यावरून प्रशासनाला धारेवर धरत संबंधित दोन अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली.‌ ‘पीडितेच्या कुटुंबाला अशा प्रकारे टार्गेट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही,‌’ असा आक्रमक पवित्रा घाटे यांनी घेतल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला.

स्वारगेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी ‌‘लव्ह जिहाद‌’चा गुन्हा दाखल झाला आहे. असे असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पीडितेच्या घराला नोटीस का दिली? या कारवाईमागे नेमका कोणाचा हात आहे? याचा शोध घेण्याची मागणी घाटे यांनी केली. केवळ एका पीडित कुटुंबाचे खच्चीकरण करण्यासाठी ही नोटीस धाडल्याचा आरोप त्यांनी केला.

या वेळी काँग््रेासचे गटनेते अरविंद शिंदे यांनी याला विरोध दर्शविला. ‌‘पीडितेचे नाव जाहीर करणे कायद्याने गुन्हा असून, घाटे यांच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो,‌’ असा इशारा शिंदे यांनी दिला.

तसेच, ही नोटीस प्रकरणापूर्वीची आहे की नंतरची, याची शहानिशा करण्याची मागणी त्यांनी केली. यावरून भाजप-काँग््रेास सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दोन दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गोंधळ थांबला.

घाटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो: शिंदे

पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा; मात्र, कायद्यानुसार पीडितेचे नाव उघड करता येत नाही. यामुळे तिचे चारित्र्यहनन होऊ शकते; परिणामी घाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. प्रशासनाने दिलेली नोटीस आणि ही घटना यांचा क्रम तपासणे गरजेचे आहे, असे मत अरविंद शिंदे यांनी मांडले.

ऑनलाइन तक्रारीच्या आधारे 16 एप्रिल रोजी ही नोटीस बजाविण्यात आली होती. तक्रारदाराचे नाव आम्ही जाहीर करू शकत नाही. मात्र, जर ही कारवाई राजकीय द्वेषातून किंवा चुकीच्या हेतूने केली असेल, तर सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा निष्कर्ष दोन दिवसांत काढला जाईल.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT