Mumbai-Pune Expressway Traffic Pudhari
पुणे

Mumbai-Pune Expressway Traffic Jam: पुणे–लोणावळा प्रवास ठरला तीन तासांचा; द्रुतगती मार्गाची कोंडी, जुन्या दिवसांची आठवण

टँकर अपघातानंतर पर्यायी मार्गांवरही वाहतूक ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

पुढारी वृत्तसेवा

सुनील कडूसकर

पुणे: पुणे-लोणावळा यादरम्यानचा 65-70 किलोमीटरचा प्रवास द्रुतगती महामार्गाने अवघ्या तास-सव्वा तासात पूर्ण होतो. तर, जुन्या रस्त्याने त्यासाठी दीड तास लागतो. पण, याच प्रवासासाठी आज मला तब्बल साडेतीन तास लागले. द्रुतगती मार्ग सुरू होण्यापूर्वी (2002) या रस्त्याने प्रवासाला असाच भरपूर वेळ लागत असे. त्याचीच आठवण आज प्रकर्षाने झाली.

लोणावळा येथे जाण्यासाठी सकाळी पावणेनऊ वाजता आम्ही आमच्या खासगी मोटारीने निघालो. लोणावळ्यातील काम व एक-दोन भेटी आटोपून दुपारी तीनपर्यंत परत यायचे, असे नियोजन होते. आडोशी बोगद्याजवळ उलटलेल्या टँकरची माहिती सकाळीच मिळाली होती. परंतु, तास-दोन तासांत वाहतूक पूर्ववत होईल, असे लोणावळ्यातील काही मित्रांनी सांगितल्याने मोटारीने जाण्याचे धाडस केले. सव्वानऊच्या सुमारास द्रुतगती महामार्गापाशी किवळे येथे पोहचलो. त्या वेळी द्रुतगती मार्गावरील वाहतूक पोलिसांनी रोखून धरलेली दिसली, तर काही खासगी प्रवासी बस द्रुतगती मार्गावरून माघारी फिरून देहूरोडकडे जाताना दिसल्या. त्यामुळे आम्हालाही लोणावळ्याला जाण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई मार्गाचा पर्याय स्वीकारावा लागला.

सोमाटणे फाटा येथील टोल नाका ओलांडून पुढे आलो, तर फाट्यावरून द्रुतगती मार्गाकडे जाणारा रस्ताही पोलिसांनी बंद केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तसेच पुढे तळेगाव-वडगावमार्गे लोणावळ्याकडे निघालो. कान्हा फाटा ओलांडून पुढे कामशेतच्या उड्डाणपुलापाशी पोहचतो न पोहचतो तोच कामशेतच्या घाटाकडे जाणारा हा उड्डाण पूलही वाहतुकीस बंद करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे सेवा रस्त्याने पुढे सरकू लागलो, तर कामशेत येथून पवनानगरच्या दिशेने वाहतूक वळविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लोणावळ्यात पोहचणे गरजेचे असल्याने 20-22 किलोमीटरचा वळसा घालत लोणावळ्यात जाणाऱ्या या रस्त्याने आमचा प्रवास सुरू झाला. काले कॉलनी ओलांडत पवना डॅमच्या भिंतीलगत असलेल्या पवनानगरपाशी पोहचलो, तर तेथेही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. अखेर काही ग््राामस्थांनी पुढाकार घेत येथील वाहतूक अन्य मार्गाने वळविल्याने पुढे जाणे शक्य झाले. पवना डॅमच्या भिंतीलगतच्या रस्त्याने आंबेगाव, दुधिवरे खिंड, औंढोली, औंढे असा प्रवास करीत आम्ही औंढे येथे द्रुतगती मार्ग ओलांडणाऱ्या पुलापाशी पोहचलो.

तर, एका वेळी एकच वाहन जाऊ शकणाऱ्या या एकेरी पुलावरही वाहतूक कोंडी झाल्याचे दृश्या समोर आले. अखेर मोटारीतील काही जणांनी पुढाकार घेत एकेका बाजूच्या गाड्यांना वाट करून द्यायला सुरुवात केली. त्यामुळे कसे बसे हा पूल ओलांडत द्रुतगती मार्गालगतच्या सर्व्हिस रोडने भांगरवाडी रस्त्यावर प्रवेश केला.

भांगरवाडी रस्त्याने अचानक वाढलेल्या या वाहतुकीने लोणावळा बझार परिसरातही वाहनांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे येथील वाहतुकीचा वेगही खूपच मंदावल्याचे दिसले. सकाळी पावणेनऊला सुरू झालेला हा प्रवास दुपारी साडेबारा वाजता संपला.

मुंबईला जाण्यासाठी पहाटेच तळेगाव टोल नाका ओलांडून पुढे आलो. परंतु, वाहनांच्या रांगा मिसिंग लिंक बोगद्यापर्यंत आल्याने पहाटे पाच पासून लोणावळ्याच्या अलिकडेच थांबून राहिलो. आता बारा तास उलटले तरी गाडी इंचभर पुढे सरकू शकली नाही.
संतसिंग पंजाबी, ट्रकचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT