Maharashtra Folk Artists Protest Pudhari
पुणे

Maharashtra Folk Artists Protest: लोककलावंतांचा संताप; ‘पद्मश्री परत करू’ असा इशारा

मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे समरसता लोककला संमेलनात नाराजी व्यक्त करत ज्येष्ठ कलावंतांनी सरकारवर गंभीर टीका केली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गावकुसाबाहेर असल्याप्रमाणे आजही लोककलावंतांच्या पदरी उपेक्षितांचे जगणे आहे. समरसता लोककला संमेलनाच्या माध्यमातून लोककलावंतांच्या अडचणी आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना सांगायचे होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीने निराशा झाली, मुख्यमंत्री आणि सांस्कृतिकमंत्र्यांनी वेळ द्यायला हवा. लोककलावंतांच्या प्रश्नांसाठी त्यांनी वेळ दिला नाही तर प्रसंगी ‘पद्मश्री’ परत करू, असा इशारा पहिल्या समरसता लोककला संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी अध्यक्षीय भाषणात रविवारी दिला.

राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि समरसता साहित्य परिषद यांच्या वतीने आयोजित या समरसता लोककला संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार होते. मात्र, ते येऊ शकले नाहीत, याबद्दल खेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘लोककलावंतांच्या पदरी आजही उपेक्षाच पडत आहे. लोकलावंतांकडून अपेक्षा व्यक्त करताना त्यांची कैफियत ऐकून घेणे हे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिकमंत्री यांचे कामच आहे. पुढील एक महिन्याच्या कालावधीत पुन्हा एकदा अशाच संमेलनाचे आयोजन मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले नाही तर आपण आपला पद्मश्री पुरस्कारही परत करू,' असे खेडकर यांनी सांगितले. संमेलनाच्या उद्घाटनावेळी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, ज्येष्ठ लावणी कलाकार सुरेखा पुणेकर, मंगला बनसोडे, छाया आणि माया खुटेगावकर, गायक नंदेश उमप, राधा खुडे, गायक सचिन कुमावत आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना प्रदान करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या भगिनी रत्ना कांबीकर यांनी स्वीकारला.

उद्घाटनाच्या सत्रात फोक प्रबोधनच्या युवा वादकांनी सादर केलेल्या पारंपरिक वाद्यांच्या जोशपूर्ण वादनाने संमेलनात चैतन्य निर्माण केले. शांती ब्रह्म गुरुकुलच्या वादकांनी पारंपरिक वारकरी पद्धतीने मृदंगवादन केले. उद्घाटनापूर्वी कलावंत दिंडी काढण्यात आली. तसेच, बालगंधर्व कलादालनात विविध लोककला वाद्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अनिल मोरे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या जान्हवी जानकर, विश्वनाथ गराडकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष धीरज घाटे, धनंजय खुडे, नीलेश गद्रे, डॉ. प्रसन्न पाटील, शाहीर हेमंत मावळे हेही उपस्थित होते.

लोककलावंत अद्याप उपेक्षित

समाजात समरसता वृद्धिंगत करण्याच्या कामात लोककलावंतांचा सहभाग वाढावा या उद्देशाने समरसता लोककला संमेलन आयोजित करण्याचा उपक्रम उल्लेखनीय असला तरी प्रत्यक्षात लोककलावंत अद्याप उपेक्षितांचे जगणे जगत आहेत. त्यांची आबाळ दूर करण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी मागणी रघुवीर खेडकर यांनी केली. लोककलावंतांचे जगणे अजूनही आव्हानात्मक स्वरूपाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT