पुणे: श्रावण सुरू झाल्यानंतर मागणी कमी होऊन लिंबाचे दर उतरण्याचे नेहमीचे चित्र यंदा उलटले आहे. उत्पादनात मोठी घट झाल्याने श्रावणात यंदा प्रथमच लिंबाला उच्चांकी दर मिळत आहेत. परिणामी, जेवणाची चव वाढविणाऱ्या लिंबाने आता गृहिणींसह हॉटेल व्यावसायिकांचेही ‘बजेट’ आंबट केले आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डात एरवी १५ ते २० किलोंच्या दीड ते दोन हजार गोण्यांची होणारी आवक सध्या अवघ्या एक हजार ते अकराशे गोण्यांवर आली आहे. परिणामी, एरवी श्रावणात १५० ते ४०० रुपयांना मिळणाऱ्या लिंबाच्या गोणीचा दर थेट ४०० ते १२०० रुपयांवर पोहोचला आहे. तर, किरकोळ बाजारात दहा रुपयांना दोन ते तीन नगांची विक्री सुरू आहे.
सरबतापासून विविध खाद्यपदार्थांपर्यंत लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, यंदा श्रावणात प्रथमच लिंबाने उच्चांकी दर गाठल्याने त्याचा फटका स्वयंपाकघरापासून हॉटेलच्या किचनपर्यंत जाणवू लागला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात लिंबाचे दर किलोमागे १७० ते १८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जून आणि जुलैमध्ये कच्च्या तसेच हिरव्या लिंबाचीही मोठ्या प्रमाणावर तोड केली. त्यात एल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सून जूनअखेरपर्यंत लांबल्याने बाजारात लिंबाला मागणी कायम राहिली.
परिणामी पुढील हंगामातील उत्पादनावर त्याचा परिणाम झाला असून ऑगस्टमध्ये बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. एरवी आखाड संपल्यानंतर आणि श्रावण सुरू झाल्यावर लिंबाची मागणी व दर दोन्ही कमी होतात. यंदा मात्र आवकच जवळपास निम्म्यावर आल्याने गोणीमागे तब्बल २५० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील दर चढे असल्याने किरकोळ बाजारातही दहा रुपयांना दोन ते तीन लिंबांची विक्री होत आहे. पुढील महिनाभर आवक कमीच राहण्याची शक्यता लिंबाचे अडतदार पुष्कराज जाधव यांनी वर्तविली.
बेसुमार झालेल्या तोडीचा आता परिणाम
एप्रिल-मे महिन्यात लिंबाला चांगले भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी पुढील काळात बाजारात येणाऱ्या लिंबाचीही लवकर तोड केली. जून-जुलैमध्येही मागणी चांगली राहिल्याने मोठ्या प्रमाणावर माल बाजारात आला. त्यामुळे ऑगस्टमध्ये झाडांवरील उत्पादन कमी पडले असून त्याचा थेट परिणाम सध्याच्या आवकेवर दिसून येत आहे.
एरवी श्रावणात लिंबाची आवक दीड ते दोन हजार गोण्यांपर्यंत असते. सध्या ती एक हजार ते अकराशे गोण्यांवर आली आहे. जून-जुलैमध्ये मोठ्या प्रमाणावर तोड झाल्याने आता उत्पादन कमी पडत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने श्रावणात प्रथमच लिंबाला एवढा चांगला दर मिळत आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील महिनाभर दर चढे राहण्याची शक्यता आहे.रोहन जाधव, लिंबाचे अडतदार, मार्केट यार्ड.