पुणे: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना पुण्यातील वकीलवर्गाने पाठिंबा दर्शविला आहे. नवोदित वकिलांच्या समस्या, न्यायालयीन पायाभूत सुविधा, वकील संरक्षण कायदा, उच्चशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी आणि पदवीधरांच्या विविध प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावी प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा वकील प्रतिनिधींनी व्यक्त केली. डॉ. जाधव यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभवाचा या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने एकत्र येत वकिलांनी डॉ. जाधव यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला. या वेळी ॲड. ॐकार इनामदार, ॲड. राकेश सोनार, ॲड. आकाश मुसळे, ॲड. भाग्यश्री गुजर-मुळे, ॲड. प्राची संग्राम जाधव, ॲड. सुशील लोणकर, ॲड. अजय गायकवाड, ॲड. साहिल भापकर, ॲड. गौरी काळे, ॲड. करण माने, ॲड. सोनत लेंगरे, ॲड. मीनाक्षी चव्हाण, ॲड. मोना जाधव, ॲड. नेहा सूर्यवंशी, जान्हवी निम्हण, रितू गाडे यांच्यासह वकील आणि पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायद्याची पदवी घेऊन वकिली व्यवसायात प्रवेश करणाऱ्या तरुणांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि कल्याणकारी योजनांचा विस्तार होणे आवश्यक असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
पुण्यातील न्यायालयांमध्ये वाढत्या कामकाजाच्या तुलनेत अपुरी जागा, वाहनतळाचा प्रश्न, वकिलांसाठी बैठकव्यवस्था आणि डिजिटल सुविधांचा अभाव, या समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. पुण्यात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करणे, नवीन न्यायालयीन इमारतीचा प्रश्न मार्गी लावणे आणि वकील संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, या मागण्यांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा होण्याची गरज वकिलांनी व्यक्त केली. डॉ. जाधव ह्या उच्चशिक्षित असून, शिक्षण संस्थेच्या प्र-कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभवामुळे उच्च शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रश्नांना योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. कायद्याचे विद्यार्थी, नवोदित वकील आणि अनुभवी विधिज्ञ यांच्या प्रश्नांमध्ये समन्वय साधून ते शासनदरबारी प्रभावीपणे मांडले जावेत, अशी भूमिकाही वकील प्रतिनिधींनी मांडली.
वकील हा उच्चशिक्षित पदवीधर घटक असून, न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. मात्र, नवोदित वकिलांना व्यवसायाच्या सुरुवातीला आर्थिक अस्थिरता, अपुऱ्या सुविधा आणि प्रशिक्षणाच्या मर्यादित संधींचा सामना करावा लागतो. या प्रश्नांवर शासनस्तरावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. डॉ. स्मिताताई जाधव यांच्या शैक्षणिक अनुभवामुळे वकील आणि पदवीधरांचे प्रश्न विधानपरिषदेत प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा आहे.ॲड. ॐकार इनामदार
पुण्यातील न्यायालयांत पायाभूत सुविधांचा विस्तार होणे, ही काळाची गरज आहे. नवीन इमारत, पुरेशी जागा, वाहनतळ, डिजिटल सुविधा आणि वकील संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा आवश्यक आहे. पुण्यात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याची मागणीही महत्त्वाची आहे. डॉ. स्मिताताई जाधव यांनी या प्रश्नांना प्राधान्य देऊन वकीलवर्गाच्या अपेक्षांना न्याय द्यावा, अशी आमची भूमिका आहे.ॲड. आकाश मुसळे
कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली व्यवसायात प्रवेश करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. मात्र, महिला वकिलांसाठी सुरक्षित वातावरण, आवश्यक सुविधा, व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. महिला पदवीधरांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या प्रश्नांकडेही विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. डॉ. स्मिताताई जाधव यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अनुभवाचा महिला वकील,पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे.ॲड. भाग्यश्री गुजर-मुळे
न्यायव्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. ई-फायलिंग, डिजिटल न्यायालयीन कामकाज आणि कायदेविषयक संशोधनासाठी नवोदित वकिलांना आवश्यक प्रशिक्षण व सुविधा मिळणे गरजेचे आहे. कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष वकिली व्यवसाय यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. डॉ. स्मिताताई जाधव यांच्या माध्यमातून तरुण वकिलांच्या कौशल्यविकासाच्या प्रश्नांना विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा आहे.ॲड. आकाश कामठे
पदवीधर मतदारसंघ हा उच्चशिक्षितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महत्त्वाचा मंच आहे. वकिली व्यवसायातील तरुणांना आर्थिक स्थैर्य, कल्याणकारी योजना आणि व्यावसायिक संधी उपलब्ध होण्यासाठी ठोस प्रयत्न आवश्यक आहेत. वकील आणि पदवीधरांचे प्रश्न एकमेकांशी निगडित असल्याने त्यांचा एकत्रित विचार होणे गरजेचे आहे. डॉ. स्मिताताई जाधव यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभवातून या प्रश्नांचा प्रभावी पाठपुरावा होईल, असा विश्वास आहे.ॲड. योगेश जैन, कार्यकारिणी सदस्य, पुणे बार असोसिएशन
वकीलवर्ग हा पदवीधर मतदारसंघातील महत्त्वाचा घटक असून, न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासोबतच वकिलांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळणे आवश्यक आहे. विशेषतः नवोदित वकिलांचे आर्थिक स्थैर्य, वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, न्यायालयीन पायाभूत सुविधांचा विस्तार आणि कल्याणकारी योजनांसाठी शासनस्तरावर ठोस पाठपुरावा होणे गरजेचे आहे. डॉ. स्मिताताई जाधव यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभवामुळे वकील व पदवीधरांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावी प्रतिनिधित्व मिळेल, असा विश्वास आहे.ॲड. राकेश सोनार.
पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केवळ उच्चशिक्षितांच्या समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवणारे असावे. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींचे उच्च शिक्षण, कायद्याच्या शिक्षणातील संधी, महिला पदवीधरांचे आर्थिक सक्षमीकरण आणि नेतृत्वविकासाला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्या पाहिजेत. डॉ. स्मिता जाधव यांचा शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभव पाहता या प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावी व्यासपीठ मिळेल, असा विश्वास आहे. महिला पदवीधरांच्या आकांक्षांना प्रतिनिधित्व मिळावे, या अपेक्षेने त्यांच्या उमेदवारीला आमचा पाठिंबा आहे.ॲड. प्राची संग्राम जाधव