Pune Shivjayanti Swarajyarath  Pudhari
पुणे

Pune Shivjayanti Swarajyarath Procession: लालमहालात ९६ स्वराज्यरथांची दिमाखदार मिरवणूक; शिवजयंतीत अवघे पुणे दुमदुमले

शिवजयंती महोत्सव समितीच्या १४व्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात लाखोंचा जनसागर, रणशिंगांचा गजर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नगाऱ्यांचा गडगडाट, शिंगांची ललकारी... ५१ रणशिगांची ललकारी... नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथकाचा रणगजर... सनई-चौघडयांचे मंगलमय सूर... लाखोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला... 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोष... अवघ्या पुण्याचे आकाश दुमदुमले. निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे लालमहाल येथे आयोजित १४ व्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे. तब्बल ९६ स्वराज्यरथांच्या अभूतपूर्व मिरवणुकीने आणि शिवभक्तांच्या अथांग महासागराने शनिवारी पुण्यात जणू शिवकालच पुन्हा अवतरल्याचा भास होत होता."

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. मिरवणूकीचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीआण्णा मोहोळ, महापौर मजुंषा नागपुरे, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, उपमहापौर परशुराम वाडेकर, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, बेळगावचे महापौर मंगेश पवार, पिंपरी चिंचवडचे स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली.

मिरवणुकीत मानाचा मुख्य रथ जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, नरवीर तानाजी मालुसरे, अटकवीर सरदार मानाजी पायगुडे, कान्होजी नाईक कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, सरदार करंजावणे देशमुख, सरदार चांगोजी कडु, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार महाप्राक्रमी गोदाजीराजे जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोंदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत राजे जाधव व राजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, श्रीमंत धार राजेपवार, श्रीमंत गायकवाड सरकार, श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद जीवाजी महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, श्रीमंत भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, सरलष्कर खंडोजी दरेकर, स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, सरदार फडतरे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश, स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके, दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे, शुरवीर सावंत स्वराज्यघराणे, सरदार मंबाजी नाईक सोनवणे, सरदार थोरात, सरदार वाबळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले.

भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युध्दकला सादर केली. नादब्रह्म ढोलताशा पथकाच्या जल्लोषपुर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, गोपी पवार, समीर जाधवराव, प्रवीणभैय्या गायकवाड, मयुरेश दळवी, ईशान गायकवाड, रिंकल गायकवाड यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.

शिवरायांवर हेलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी….

ईशान अमित गायकवाड यांवी सलग १५ व्या वर्षी शिवजयंती १९ फेब्रुवारीला शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर हैलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी केली. यावेळी ईशान गायकवाड म्‍हणाला, आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकावर शिवरायांचे संस्कार हे लहानपणीच झाले असतात. शिवाजी महाराज म्हणले की आपसुकच आपण जय म्हणतो. माझे हे परमभाग्य आहे की शिवरायांच्या विश्वातील पहिल्या स्मारकावर मी सलग १३ वर्षे पुष्पवृष्टी करतो आहे. १९ फेब्रुवारीला विश्ववंदनीय शिवरायांच आणि आमच्या गायकवाड स्वराज्यपरिवाराचे हे एक भावनिक नात निर्माण झाल आहे.

शिवजयंतीचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही महाराजांची महंती मोठी आहे. या मिरवणुकीत ज्या घराण्यांनी स्वराज्य निर्मितीत योगदान दिले त्यांचे वैभवशाली रथ सहभागी झाले आहेत. महाराजांचे वैभव जतन केले जात आहे आणि पुण्याच्या लौकिकात भर पाडत आहेत ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
मुरलीधर मोहोळ (केंद्रीय सहकार राज्यमंत्री)
आज एका महान युगपुरुषाचा जन्म दिवस साजरा करीत आहोत. केवळ मिरवणुका, गुलाल उधळणे हे करून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा महाराजांचे विचार नव्या पिढी पुढे न्यायला पाहिजे. ही मिरवणूक शिस्तबद्ध, नियमात आणि शांततेत पार पडते. कोठेही गुलालाची वापर होत नाही ही अभिमानाची गोष्ट आहे.
मंजुषा नागपुरे (महापौर, पुणे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT