Amitesh Kumar Pudhari
पुणे

Pune Koyta Crime: पुण्यात कोयत्याने होणाऱ्या गुन्ह्यांत ६५ टक्क्यांनी घट; पोलिस आयुक्तांची माहिती

२०२३ मधील ३५८ गुन्हे यंदा १२६ वर; मकोका, आर्म्स ॲक्ट आणि तडीपारीच्या कारवायांना वेग

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एकीकडे शिवाजीगनर कोर्टाबाहेर कोयत्याने केलेल्या खुनी हल्ल्यामुळे पुणे पोलिसांना टिकेला सामोरे जावे लागत असताना, दुसरीकडे मात्र कोयताधारी टोळक्याला जरब बसवली असून, अशा गुन्ह्यात तब्बल ६५ टक्क्यांनी घट झाल्याचा दावा पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे.

  • Pune Crime News

  • MPDA Action

  • Pune Crime Rate 2026

पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रतिबंधात्मक कारवायांमुळे कोयता वापरून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांत ६५ टक्क्यांची घट झाली आहे. २०२३ मध्ये कोयता वापरून ३५८ गुन्हे घडले होते. यंदा १५ नोव्हेंबरअखेर ही संख्या १२६ वर आली आहे. मकोका, आर्म्स ॲक्ट, तडीपारी आणि एमपीडीएअंतर्गत केलेल्या कारवायांमुळे संघटित गुन्हेगारीला मोठा लगाम बसवल्याचे देखील पोलिसांनी म्हटले आहे. शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे या आरोपीवर झालेल्या खुनी हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले.

राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केले. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणानंतर नाराजी व्यक्त केली. अशातच उपमुख्यमंत्री व पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून त्यांना सूचना करत फैलावर घेतले. या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारीची सद्यस्थिती, गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी आणि पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांची माहिती पवार यांना दिली. कोयता वापरून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये झालेली घट आणि संघटित गुन्हेगारीविरोधात केलेल्या कारवायांचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्‍यासमोर मांडण्यात आला.

खून, दरोडे आणि सोनसाखळी चोरीत घट

शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांची संख्या २०२३ मधील ३ हजार ६९५ वरून यंदा ३ हजार १७४ वर आली आहे. खुनाचे गुन्हे १०३ वरून ७४, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे २५५ वरून १८४, तर दंगलीचे गुन्हे २४३ वरून १६२ झाले आहेत. विनयभंगाचे गुन्हे २०२४ मधील ५९८ वरून ४६८, तर अपहरणाचे गुन्हे ९९७ वरून ७३४ वर आले आहेत. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही घट झाली आहे. २०२३ मधील ६३२४ गुन्ह्यांच्या तुलनेत यंदा ४६३३ गुन्हे नोंदवले गेले. दरोड्याचे गुन्हे २०२४ मधील २६ वरून १२ वर आले आहेत. जबरी चोरीचे गुन्हे २४७ वरून १६४, तर सोनसाखळी चोरीचे गुन्हे १८९ वरून १०९ झाले आहेत. घरफोडीचे गुन्हे ६२६ वरून ४६५, तर वाहन चोरीचे गुन्हे २७८४ वरून १९४५ वर आले आहेत. एकूणच, संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी केलेल्या कठोर कारवायांमुळे गुन्हेगारीला आळा बसल्याचे पोलिस आयुक्‍तांनी सांगितले.

कोयता गुन्ह्यांचा आलेख घसरला

पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये कोयता वापरून ३५८ गुन्हे घडले होते. २०२४ मध्ये ही संख्या २६६, २०२५ मध्ये १९४, तर चालू वर्षात १५ नोव्हेंबरपर्यंत १२६ वर आली आहे. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यां विरोधात आर्म्स ॲक्टनुसार कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. २०२३ मध्ये ७०२ कारवाया झाल्या होत्या. यंदा हा आकडा १ हजार १३८ वर पोहोचला आहे.

मकोका, तडीपारीची मोठी कारवाई

संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मकोकाचा वापर वाढवण्यात आला आहे. २०२३ मध्ये १००, २०२४ मध्ये ४८, २०२५ मध्ये १०७, तर या वर्षात १३८ मकोका कारवाया करण्यात आल्या. तडीपारीच्या कारवायांमध्येही वाढ झाली असून, २०२३ मधील १०२ गुन्हेगारांच्या तुलनेत यंदा २५६ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. एमपीडीएअंतर्गत यंदा ७३ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT