पुणे: मानसिक तणावातून कोथरूड येथील नामांकित विद्यालयातील इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
अभिजित सिंघम शेट्टी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मूळचा हैदराबादचा असलेला अभिजित इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी पुण्यात आला होता. गुरुवारी (दि. २९) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिजित कोथरूडमधील नामांकित विद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. तो कानिफनाथ परिसरातील एसआर बिल्डिंगमधील एका सदनिकेत भाड्याने राहत होता. या सदनिकेत तो एकटाच राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी पहाटे त्याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. अभिजितसोबत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांची पोलिसांनी चौकशी केली.
त्यांच्या जबाबातून अभिजित गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती पुढे आली आहे. परीक्षेत एटीकेटी लागल्यामुळे तो अस्वस्थ होता, असे त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.
मात्र, एटीकेटीमुळेच त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, की यामागे अन्य काही कारणे होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळी सुसाइड नोट न मिळाल्याने आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.