Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Koregaon Park Civic Issues: कोट्यवधींचा निधी खर्चूनही कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन परिसरातील समस्या कायम; मनपा कर्मचाऱ्यांच्या कामाचे ऑडिट करण्याची मागणी

सफाई, ड्रेनेज, पाणी आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था; बायोमेट्रिक हजेरीसह प्रत्यक्ष कामाची तपासणी करून दोषींवर कारवाईची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव पार्क: महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, पुणे स्टेशन, घोरपडी गाव, जय जवाननगर आदी परिसरांतील मूलभूत नागरी समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. निधीचा विनियोग तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे ऑडिट करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक व प्रत्यक्ष हजेरी तपासावी, प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि त्यांच्या कामाची पाहणी करावी. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव पार्क येथील नागरिक विल्सन धनपाल यांनी केली आहे.

ताडीवाला रोड परिसराचा बहुतांश भाग रेल्वेच्या अखत्यारित असला, तरी दाट लोकवस्तीमुळे या भागातील नागरिकांना महापालिकेकडून विविध नागरी सुविधा पुरविल्या जातात. दरवर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, पाणी, स्वच्छता, ड्रेनेज आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना वारंवार प्रशासनाविरोधात आंदोलन करावे लागत आहे.

वर्षांनुवर्षे राजकीय नेत्यांनी या भागाचे प्रतिनिधित्व करूनही प्रत्यक्ष विकासकामे दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये महापालिका अधिकारी व मुकादमांकडून आपल्या जबाबदाऱ्या झटकून स्वयंसेवी संस्थांच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार सोपविला जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्थाही दयनीय झाली आहे. अनेक स्वच्छतागृहांमध्ये नळ, पाणी आणि दिव्यांची सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी दरवाजे मोडकळीस आले असून, स्वच्छतेचा अभाव आहे. ड्रेनेजची चेंबर्स तुंबल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी, डास आणि अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष परिसरात जाऊन समस्यांचा आढावा घ्यावा. प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कामाचे स्वरूप, निधीचा खर्च आणि त्यातून झालेली कामे यांचे स्वतंत्र ऑडिट करावे. तसेच नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्वच्छतेचा प्रश्न बनला गंभीर

पुणे स्टेशन, जय जवाननगर, कोरेगाव पार्क आणि घोरपडी परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही सफाई कर्मचारी प्रत्यक्ष कामावर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. काही कर्मचारी घरी बसून वेतन घेत असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. या आरोपांची प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करून बायोमेट्रिक हजेरी, प्रत्यक्ष उपस्थिती आणि नेमून दिलेल्या कामाची पडताळणी करणे आवश्यक आहे.

परिसरातील समस्यांची माहिती घेऊन आढावा घेतला जाईल. त्यानंतर संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
भास्कर महाडिक, सहायक आयुक्त, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT