Pune Ganeshotsav Restrictions: ‘आम्हाला निर्बंधमुक्त गणेशोत्सव हवा!’; पुण्यात गणेश मंडळांचा प्रशासनाला इशारा

डीजेवरील निर्बंधांवरून कार्यकर्ते आक्रमक; जाहिरात शुल्क-दंड माफ, खाद्य-पाणी स्टॉल्सना मोकळीक, मात्र ध्वनिव्यवस्थेवरील अंतिम निर्णय पोलिस आयुक्तांकडे
Pune Ganeshotsav Restrictions Meeting
Pune Ganeshotsav Restrictions MeetingPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहतात; मग त्यांच्यासाठी नियम वेगळे आणि शतकोत्तरी परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी वेगळे नियम का, भाविकांच्या श्रद्धेच्या उत्सवात देखावे, ध्वनिव्यवस्था आणि मिरवणुकांवरच वेळेचे जाचक निर्बंध का लादले जातात, असा संतप्त सवाल करत आम्हाला निर्बंधमुक्त गणेशोत्सव हवा आहे. डीजेवर बंदी नकोच अशी एकप्रकारे दमबाजी करत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. गणेशोत्सव साजरा करतांना मंडळांना विविध सोयीसुविधा द्याव्यात, जाहिरातीवरील शुल्क माफ करावे, रस्त्यावरील खड्डे त्वरित दुरुस्त करावे, यासह विविध मागण्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केल्या.

Pune Ganeshotsav Restrictions Meeting
Pune UDAN Scheme: ‘उडान’ला पुणेकरांची पसंती! दोन महिन्यांत ३४७ फेऱ्या; १९ हजारांहून अधिक प्रवाशांचा हवाई प्रवास

आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक झाली. यंदा पोलिसांनी डीजेवर निर्बंध लावले आहेत. याचे पडसाद या संयुक्त बैठकीत उमटले. पोलिसांच्या नियमांच्या कथित दुटप्पीपणावरून कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

या बैठकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्सवावरील निर्बंध शिथिल करण्याची जोरदार मागणी केली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, शिवसेना (उबाठा) पक्षाचे गटनेते नितीन गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते काका चव्हाण, अतिरिक्त पोलिस आयुक्त, सहायक पोलिस आयुक्त, महापालिका अधिकारी आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune Ganeshotsav Restrictions Meeting
Maharashtra ITR Filing: आयकर विवरणपत्रांत महाराष्ट्र अव्वल; १.४० कोटी ITR दाखल, पुणे विभागाचे १.३३ लाख कोटींचे करसंकलन

बैठकीत ध्वनिव्यवस्था, जाहिरात शुल्क, रस्त्यांवरील खड्डे, लटकत्या तारा, धोकादायक वाढलेल्या झाडांच्या फांद्या, विसर्जन मार्ग, स्वच्छतागृहे आणि परवानग्यांमधील अडथळे यावरून कार्यकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवक दत्ता सगरे यांनी गणेश मंडळांना देखावे उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची मागणी केली. अनिकेत देशमाने यांनी ध्वनिव्यवस्थेवर निर्बंध आणि अतिरिक्त शुल्क आकारू नये, अशी मागणी केली. ॲड. रूपाली ठोंबरे पाटील यांनी नोंदणीकृत मंडळांना एक खिडकी योजनेतून परवानगी देण्यासह दहीहंडी उत्सवाला रात्री १२पर्यंत मुदत देण्याची मागणी केली. ऋषिकेश बालगुडे यांनी पाच वर्षांसाठी परवानग्या ग्राह्य धरण्याचा निर्णय झालेला असतानाही त्याची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल केला. शैलेश बढाई यांनी बैठकीत घेतलेले निर्णय प्रत्यक्षात येत नसल्याची तक्रार केली. विसर्जन मार्गांवर स्वच्छतागृहे उभारण्यासह महिलांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.

Pune Ganeshotsav Restrictions Meeting
Maharashtra Water Contamination: राज्यातील पिण्याच्या पाण्यात रासायनिक प्रदूषणाचे संकट; नांदेड सर्वाधिक, नागपूर तिसऱ्या क्रमांकावर

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि धूमधडाक्यात साजरा करण्याची भूमिका मांडली. जाहिरात शुल्कमाफीच्या निर्णयाला ॲड. नीलेश निकम यांनी पाठिंबा दिला. धनंजय देशमुख यांनी मानाच्या गणपतींसह पूर्व भागातील सर्व गणेश मंडळांना समान न्याय मिळावा, अशी मागणी केली. रवींद्र माळवदकर आणि महेश सूर्यवंशी यांनी प्लाझ्मा आणि लेझरबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. गणेश बिडकर यांनी जाहिराती, गणेशमूर्ती विक्री आणि मंडळांच्या स्टॉल्सबाबत कायमस्वरूपी कार्यपद्धती तयार करण्याची सूचना केली. पोलिस अधिकारी संजीव दराडे यांनी मंडळांच्या भावना पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. आगमनापासून विसर्जनापर्यंत पोलिस बंदोबस्तात कार्यरत असतात. सीसीटीव्ही, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि एक खिडकी योजनेच्या माध्यमातून अडथळे दूर करून समन्वयाने उत्सव साजरा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दहीहंडीच्या वेळेतील शिथिलतेचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर मंजूषा नागपुरे यांनी रस्ते आणि पदपथ दुरुस्ती, प्रकाशव्यवस्था, स्वागत कमानी, स्वच्छतागृहे आणि हिरकणी कक्षांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर देखावा स्पर्धा घेऊन त्यातून शहरस्तरीय विजेता निवडण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

कार्यकर्त्याला फरपटत सभागृहाबाहेर काढले

बैठकीत नारायण पेठ येथील विद्यानंद बापट यांनी डीजेमुळे होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करताच काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते बापट यांच्या अंगावर धावून गेल्याचे दिसून आले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी बापट यांना अक्षरशः ओढत सभागृहाबाहेर काढले. या प्रकाराबाबत महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या, 'मी बसलेल्या ठिकाणाहून हा प्रकार दिसला नाही. नेमके काय घडले, याची माहिती घेऊन तपासावे लागेल.'

Pune Ganeshotsav Restrictions Meeting
CET Cell Admission Rules: संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी सेलचे कडक नियम; पारदर्शकता बंधनकारक

गणेश मंडळांचे जाहिरात शुल्क-दंड माफ; खाद्य-पाणी स्टॉल्सनाही मोकळीक

गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर यंदा कोणतेही शुल्क अथवा दंड आकारला जाणार नाही. मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या स्टॉल्सवरही जाचक निर्बंध लादले जाणार नाहीत. सर्व परवानग्या ऑनलाइन एक खिडकी योजनेतून देण्यासह मंडळे आणि देखाव्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात येणार आहे, अशी घोषणा महापौर मंजूषा नागपुरे यांनी केली. रस्ते व पदपथ दुरुस्ती, प्रकाशव्यवस्था, स्वागत कमानी, स्वच्छतागृहे आणि हिरकणी कक्षांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर देखावा स्पर्धा घेऊन शहरस्तरीय विजेता निवडण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. गणेशोत्सव निर्बंधमुक्त करण्याची आग्रही मागणी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत केली. ध्वनिव्यवस्था, बेस-टॉपची संख्या आणि वेळेच्या मर्यादेबाबतचा अंतिम निर्णय मात्र पोलिस आयुक्तांच्या स्तरावर घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात परवानगी, तर आम्हीही डीजे वाजवणार

पोलिसांनी डीजेवर निर्बंध लावले आहे. यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत संतप्त भूमिका घेतली. गणेश मंडळांचे कार्यकर्ते डीजेसाठी आग्रही होते. आम्ही डीजे आणि साऊंड सिस्टिम वाजवणारच अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. काही कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर धरत पोलिसांचा निषेध केला. या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा दाखला देण्यात आला होता. 'आम्ही चार बेस चार टॉपच वाजवणार होतो. मात्र, ज्या नियमाने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यक्रमात ४ हजार ढोल ज्या डेसीबलने वाजवले त्याच डेसीबलने आम्ही तितकेच बेस आणि टॉप वाजवणार असे पोस्टर बैठकीत झळकवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news