पुणे: महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४० मध्ये (कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी) एकीकडे भाजपच्या चारही उमेदवारांची विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश उर्फ बाळा कवडे आणि गंगाधर बधे यांनी ईव्हीएम मशीन, मतमोजणी प्रक्रिया, भाजपच्या उमेदवारांना सारखीच मते पडल्यावरून ही निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केल्याने केंद्रावर अनपेक्षीत गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक राडा पहावयास मिळाला.
'ईव्हीएम हटाव, देश बचाव'च्या घोषणांमुळे आणि उमेदवारांसह कार्यकर्तेही ढसाढसा रडू लागल्यामुळे पोलिस यंत्रणाही हबकून गेल्याचे पहावयास मिळाले. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत घडलेला प्रसंग चांगला हाताळल्याने निर्माण झालेला तणाव नंतर निवळला.
कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग ४० ची मतमोजणी करताना निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान यंत्राचे क्रम बदलले. तसेच भाजपच्या सर्वच उमेदवारांना सारखी मते कशी पडतात? यासारखे आक्षेप घेतला होता. त्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळा कवडे यांनी मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत मतदान यंत्रांची फेरबदल केल्याचा आरोप केला. त्यावरून गोंधळ उडाला. त्याचवेळी त्यांना अश्रू अनावर होत त्यांनी आत्महत्येचा इशाराही पोलिसांसमोरच दिला होता. त्याचवेळी गंगाधर बधे यांनीही मतमोजणीवेळी अ, ब, क आणि ड या क्रमाने यंत्रे लावणे अपेक्षित असताना त्याचे क्रम बदलल्याचा आरोप केला. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी अर्ज घेत नसल्याची त्यांनी तक्रारही केली.
याबाबत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर गव्हाड म्हणाले की, निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारांकडून एकूण सात तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी सहा तक्रार अर्ज हे मतदानाशी संबंधित असल्याने त्यावर कालच तक्रार करणे अपेक्षित होते. शुक्रवारी मतमोजणीबाबत तक्रार केली असता ती ग्राह्य धरली असती. त्यामुळे सहा तक्रार अर्ज फेटाळून लावण्यात आले. तसेच बधे यांनी मते सारखीच कशी पडतात, असा सवाल करून मतमोजणी पुन्हा करण्याची मागणी केली. मात्र, मतदान यंत्रात पडणारी मते ही वैधच ठरतात. तरीही आम्ही त्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या दोन केंद्रातील मतदान यंत्रातील मतांची मोजणी केली असता पूर्वी केलेल्या मतांची आणि शहानिशा केलेल्या मतांची पडताळणी ही सारखी असल्याने मतमोजणीत कोणतीही तफावत नसल्याचे आढळले.''
ना मीडिया सेल, ना बैठक व्यवस्था....
प्रभाग 39 व 40 च्या मतमोजणी केंद्रात माध्यम प्रतिनिधींसाठी मीडिया सेल आणि बैठक व्यवस्था करण्यात आल्याचे 15 जानेवारीला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी शुक्रवारी या केंद्रात अशी कोणतीच व्यवस्था केली नाही. पिण्याच्या पाण्यासह कोणत्याच सुविधाही या ठिकाणी नव्हत्या. पोलिसही पत्रकारांना मतमोजणी केंद्रात जावू देत नव्हते. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोबाईलसह मतमोजणी केंद्रात उघडपणे वावरत असताना त्यांना कोणताच अटकाव होताना दिसून आला नाही. पत्रकारांना निकालाची फेरीनिहाय आकडेवारीसुध्दा दिली गेली नसल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली.