पुणे: आर्थिक व्यवहारातून व्यापाऱ्याचे तब्बल दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या टोळक्याला गुन्हे शाखा युनिट एक आणि दोनच्या पथकाने खेड शिवापूर परिसरातून पाठलाग करून 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या.
प्रणव बबन निवंगुणे (वय 23, रा रा. गणेश हौसिंग सोसायटी, आंबेगाव पठार), साहिल श्रीकांत खुटवड (वय 21, रा. गल्ली नंबर 4, काशिदनगर, भिलारेवाडी, कात्रज), सौरभ विश्वनाथ पवार (वय 27, रा. सागर सोसायटी, बावधन खुर्द, पुणे), शिरीष जितेंद्र खोपडे (वय 26, आंबेगाव पठार, कात्रज) आणि मंदार श्रीधर दारवटकर (वय 30, रा. म्हसोबा मंदिर राजवर्धन हाईट्स, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यापाऱ्याच्या पत्नीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी गुलटेकडीतील महर्षिनगर भागात राहायला आहे. 24 मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तक्रारदार महिलेचे पती दुकानात गेले. दुपारी ते घरी जेवण करण्यासाठी यायचे. मात्र, दुपारी जेवण करण्यासाठी पती घरी आले नाहीत. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास महिलेने संपर्क साधला. त्यानंतर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून महिलेच्या पतीने संपर्क साधला. ‘माझे अपहरण करण्यात आले आहे. माझ्या जीवाला धोका आहे. मला डांबून ठेवले आहे’, असे व्यापाऱ्याने पत्नीला सांगितले. अपहरण करणाऱ्या आरोपींनी पत्नीकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्यानंतर पतीची सुटका करतो, अशी धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या पत्नीने स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांकडे तक्रार दिली.
दरम्यान, या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेची व स्वारगेट पोलिस ठाण्याचे पथक समांतर तपास करत होते. त्यानुसार सापळा रचण्यात आला. आरोपींनी फोनवर दीड कोटीची खंडणी मागितली आणि त्यानंतर दोन दिवसात पैसे जमा करण्याचे आरोपींनी व्यापाऱ्याच्या पत्नीला सांगितले. दरम्यान ठरल्याप्रमाणे पोलिसांच्या सांगण्यावरून सापळा रचण्यात आला. आरोपींनी खंडणीची रक्कम स्वारगेट येथील मित्रमंडळ चौक येथे घेऊन येण्यास सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने दोन पथके तयार केली. एक पथक ही रक्कम घेऊन मित्रमंडळ चौक येथे थाबले. या वेळी ही रक्कम घेण्यासाठी आलेल्या दोघांना पथकाने ताब्यात घेतले आणि इतर आरोपींना कारमधून पळून जाताना खेड शिवापूर येथून अटक केली.
दरम्यान अटक केलेल्यांपैकी काही आरोपींचे आणि फिर्यादीच्या पतीचे जीएसटीच्या अनुषंगाने काही आर्थिक व्यवहार होते. त्यातूनच हे अपहरण झाल्याचा प्रकारसमोर आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक, शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने राम राजमाने, खंडणी विरोधी पथक 2 चे विश्वजित काईंगडे, युनिट 1 चे अजित जाधव, युनिट 2 चे सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ व या पथकातील अंमलदारांनी ही कामगिरी बजावली.