Pune Kharadi Rave Party Busted Rohini Khadse Husband Detaind
पुणे: पुणे शहराला हादरवून सोडणाऱ्या अमली पदार्थांच्या रॅकेटवर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा प्रहार केला आहे. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये 'हाऊस पार्टी'च्या नावाखाली सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी (दि.२७) पहाटे धाड टाकली. यामुळे पुणे शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडी येथील स्टे बर्ड या आलिशान गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकांनी रविवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त करण्यात आला असून, दोन तरुणींसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच तीन तरुणी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्या असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या कारवाईत पोलिसांनी ५ पुरुष आणि २ महिलांना घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांममध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश आढळून आला आहे. ते एकनाथ खडसे यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती असल्याची माहिती समोर आली आहे.
पहाटेच्या कारवाईने उडाली खळबळ
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला खराडीतील एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मध्यरात्री सुमारे साडेतीन वाजताच्या सुमारास या फ्लॅटवर छापा टाकला. 'हाऊस पार्टी'च्या नावाखाली येथे अमली पदार्थांचे सेवन आणि हुक्का पार्टी सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. या अचानक झालेल्या कारवाईमुळे पार्टीत सहभागी असलेल्यांची झोप उडाली.
अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त
या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामुळे या पार्टीचे गंभीर स्वरूप समोर आले आहे. गांजा आणि इतर अमली पदार्थांचा साठा, मोठ्या प्रमाणात महागड्या दारूच्या बाटल्या, हुक्का पॉट्स आणि त्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
फरार तरुणींचा शोध सुरू
पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण सात जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ५ पुरुष आणि २ महिला आहेत. कारवाई सुरू असताना तीन तरुणी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. या फरार तरुणींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्यांचा माग काढला जात आहे. या कारवाईने पुणे शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर पार्ट्या आणि अमली पदार्थांच्या वापराचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत.