Pune Kharadi Engineer Case Pudhari
पुणे

Pune Kharadi Engineer Case: पुण्यात सायबर फसवणुकीच्या धमकीनंतर तरुण अभियंत्याचा मृत्यू; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

हरियाणाचा पोलिस अधिकारी असल्याचे सांगून ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली होती धमकी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: खराडी येथील एका इमारतीवरून उडी मारून संगणक अभियंत्याने आत्महत्या केली. शिखर कुमारगौरव सक्सेना (वय २२, मूळ रा. हरिद्वार, उत्तराखंड) असे त्याचे नाव आहे. हरियाणातील पोलिस अधिकारी असल्याचे सांगून ड्रग्ज विक्रीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याची धमकी देत एकाने त्याच्याकडे पैशांसाठी दबाव टाकल्यामुळे शिखरने आत्महत्या केल्याचा दावा वडिलांनी केला आहे. त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून अजयकुमार भाटिया आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा खराडी पोलिसांनी दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिखरने हिमाचल प्रदेशातून बी.टेक.चे शिक्षण पूर्ण केले होते. पुण्यातील मगरपट्टा येथील एका कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर तो २३ जुलै रोजी पुण्यात आला. सुरुवातीला हिंजवडीतील हॉटेलमध्ये राहिल्यानंतर १ सप्टेंबरपासून तो खराडीतील एका पीजीमध्ये वास्तव्यास होता.

शिखरच्या आईला ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने शिखरबाबत चौकशी केली. त्यानंतर वडिलांनी संबंधित क्रमांकाची माहिती घेतली असता, तो क्रमांक अजयकुमार भाटिया नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समजले. वडिलांनी त्याच्याशी संपर्क साधला असता, त्याने शिखरचा मित्र असल्याचे सांगितले. मात्र, शिखरशी संपर्क होत नसल्याने वडिलांनी पुन्हा संबंधित व्यक्तीला फोन केला.

त्या वेळी त्याने आपण हरियाणातील गुरुग्राम येथील सेक्टर २९ मध्ये सब-इन्स्पेक्टर असल्याचा दावा केला. शिखर पुण्यात मुलींना ड्रग्ज पुरवत असल्याची तक्रार मिळाली असून, त्याला अटक केली जाईल, अशी धमकी दिल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. या धमक्यांमुळे शिखरवर मानसिक दबाव निर्माण झाला होता, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, शिखरचा मोबाइल बंद असल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, त्याचा शोध लागत नसल्याने मामाने खराडी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता शिखरने खराडीतील रिव्हरडेल सूट सोसायटीच्या इमारतीवरून उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या शिखरला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

लॅपटॉपमधील चॅटिंग, व्यवहारांचे स्क्रीनशॉटमुळे संशय

शिखरच्या लॅपटॉपमध्ये व्हॉट्सॲपवरील चॅटिंग, विविध खात्यांवर पैसे पाठवल्याचे तपशील आणि आर्थिक व्यवहारांचे स्क्रीनशॉट आढळल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. संबंधित व्यक्तींनी धमक्या देऊन पैशांची मागणी केल्यामुळे शिखरने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या व्यवहारांमागील व्यक्ती, पैशांच्या मागणीचे स्वरूप आणि ऑनलाइन संपर्काची पृष्ठभूमी तपासातून स्पष्ट होणार आहे.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आत्महत्या केलेल्या तरुणाला फोन करणाऱ्या व्यक्तीचा नंबर शोधून काढला आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतरच नेमका काय प्रकार आहे, याची माहिती मिळेल. तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खराडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT