Crime News Pudhari
पुणे

Pune Crime: कात्रजमध्ये १७ वर्षीय मुलाचा कोयत्याने वार करून खून; सात अल्पवयीन आरोपींवर गुन्हा

जुन्या वादातून हत्येचा कट? तब्बल ३० वार; चौघे ताब्यात, तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर १७ वर्षीय मुलाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री सुमारे १० वाजता कात्रज तलाव परिसरातील कात्रज कट्टा हॉटेलसमोर घडली. या प्रकरणात सात अल्पवयीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी चौघांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित तिघांचा शोध भारती विद्यापीठ पोलिस घेत आहेत. गणेश रवींद्र मावळे (वय १७) खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश रामदास चव्हाण (वय २२) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मावळे याच्यावर खुनाचा प्रयत्नासह सहा गुन्हे दाखल होते. काही महिन्यांपूर्वी गणेशचा एका अल्पवयीन आरोपीच्या बहिणीशी वाद झाला होता. त्यानंतर संबंधित आरोपीने गणेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वीच त्याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

सोमवारी रात्री गणेश आणि फिर्यादी कात्रज तलाव परिसरात थांबले असताना दोन दुचाकींवरून सात अल्पवयीन आरोपी तेथे आले. त्यांनी गणेशला अडवून कोयत्याने बेछूट वार केले. डोके, चेहरा आणि छातीवर सुमारे ३० वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या गणेशला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी आरोपींनी गणेश याच्‍यावर तब्‍बल तीस वार केल्‍याचे तपासातून समोर आले आहे.

पोलिसांनी परिस्‍थिती आणली नियंत्रणात

गणेश मावळे खून प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिस वाहनाच्‍या बोनेटवर बसवून आरोपींची धिंड काढत असताना त्यावेळी पोलिस ठाण्याबाहेर उपस्थित असलेल्या मृताच्या आईने संतापाच्या भरात आरोपीवर झेप घेत त्याला चपलीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT