Nature Photography Exhibition Pudhari
पुणे

Pune Nature Photography Exhibition: पुण्यात ‘प्रतिबिंब’ छायाचित्र प्रदर्शन सुरू; निसर्गाचे मनमोहक क्षण रसिकांसाठी खुले

बालगंधर्व कलादालनात 13 हौशी कलाकारांच्या 130 निसर्गछायाचित्रांचे प्रदर्शन सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वन्यजीव, पक्षी, निसर्गदृश्ये याविषयी शब्दांतून व्यक्त न करता येणाऱ्या भावभावना छायाचित्रांच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येत आहेत. निमित्त आहे ते ‌‘प्रतिबिंब‌’ या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे.

व्यवसाय सांभाळून निसर्गाचे ‌‘प्रतिबिंब‌’ टिपणाऱ्या 13 गुणी हौशी कलाकारांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला रविवारी (दि. 24) बालगंधर्व कलादालनात सुरुवात झाली. ‌‘सुखी पांडा‌’, ‌‘देहम नेचरक्युअर‌’, ‌‘डिस्कव्हर नेचर‌’ आणि ‌‘शांतीवन, पाचगणी‌’ यांच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी रसिकांचा प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ प्रकाशचित्रकार सुधीर हसमनीस, जतिन सुरतवाला, हैतवी सुरतवाला, अनंतप्रसाद देशपांडे, प्रदीप कामत, केदार दंडगे, समीर चाफेकर आदी उपस्थित होते.

प्रदर्शनाचे यंदाचे दुसरे वर्ष असून, अमर अतितकर, अमेय वाळवेकर, ओंकार मुळगुंद, शंतनु अंबुळगेकर, शिवयोगी कंठी, नूतन खेडेकर, व्यंकटेशन कालवै आदी कलाकारांच्या 130 कलाकृती या प्रदर्शनात पाहता येत आहेत.

पाकणीकर यांनी निसर्गातील अद्भुत क्षण टिपून ते रसिकांपर्यंत पोहचविणे मनाला समाधान देणारे असते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात स्वत: काढलेल्या प्रकाशचित्रांच्या स्वामित्व हक्काबाबत प्रत्येकाने जागरूक राहा, असा सल्लाही दिला. प्रिया मुळगुंद यांनी सूत्रसंचालन केले. हे प्रदर्शन मंगळवारपर्यंत (दि. 26 मे) सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत पाहावयास खुले राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT