रखमा रामभाऊ शिंदे Pudhari
पुणे

Leopard Attack Junnar | जुन्नर येथे दुचाकीचा टायर ओढत बिबट्याचा हल्ला; दुचाकीस्वारावर जखमी

जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील शिंदेमळा परिसरात दुचाकीवरून घरी जाताना दुचाकीस्वारावर हल्ला

पुढारी वृत्तसेवा

Junnar Leopard Attack Biker Injured

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील शिंदेमळा परिसरात दुचाकीवरून घरी जात असलेल्या रखमा रामभाऊ शिंदे (वय ५५) यांच्यावर बिबट्याने झडप घालून हल्ला केला. मंगळवारी (दि. २७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कुकडी कालव्याजवळील जिल्हा परिषद शाळेजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात शिंदे यांच्या पोटरीला बिबट्याचे दोन दात लागले असून, त्यांच्यावर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रखमा शिंदे हे मंगळवारी भोरवाडी येथे शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून भोरवाडीकडून बोरी बुद्रुककडे घरी जात होते. कुकडी कालव्याजवळील जिल्हा परिषद शाळेजवळ उसाची तोडणी सुरू असलेल्या ठिकाणी अचानक बिबट्याने मागून येत त्यांच्या पायावर झडप घातली. या वेळी बिबट्याचे दात पोटरीला लागल्याने ते खाली पडले.

बिबट्या पुन्हा हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी लपून बसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बिबट्या दुचाकीचा टायर बाजूला ओढत आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण या हल्ल्यातून बचावलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हल्ल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची गर्दी झाल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. स्थानिकांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी शिंदे यांना तातडीने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

बोरी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी

बोरी परिसरात बिबट्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. वनविभागाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची पुरेशी दखल घेतली जात नसल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली.

साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊसतोडणीला वेग आला आहे. उसाच्या शेतातून बिबटे बाहेर पडत असून, ऊसतोडणीदरम्यान मजुरांना बिबट्याची पिल्लेही आढळून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी शेतात काम करताना विशेष काळजी घ्यावी. सोबत काठी ठेवावी तसेच मोबाईलवर गाणी सुरू ठेवून काम करावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे यांनी केले.

दरम्यान, माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात १५५ बिबटे असून, बिबट्यांचा उपद्रव असलेल्या भागात पिंजरा लावण्याची मागणी झाल्यास पिंजरेही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे जुन्नर विभागाचे वनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT