Pune News : पदवीधर मतदारसंघासाठी १००, शिक्षक मतदारसंघासाठी ४७ टेबलांवर मतमोजणी

१,३८१ मतपेट्यांमधील मतांची मोजणी; प्रशासनाकडून चोख नियोजन
फाईल फोटो
फाईल फोटो
Published on: 
Updated on: 

पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. ही मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या प्रक्रियेत पदवीधर मतदारसंघासाठी १००, तर शिक्षक मतदारसंघासाठी ४७ टेबलांवर मतमोजणी होणार असून, दोन्ही मतदारसंघांतील एकूण १,३८१ मतपेट्यांमधील मतांची मोजणी केली जाणार आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी ७४१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती आणि त्यासाठी एकूण १,०२९ मतपेट्यांचा वापर करण्यात आला. या मतपेट्यांमधील मतांची मोजणी करण्यासाठी १०० टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतपेट्यांची मोठी संख्या लक्षात घेता मतमोजणीच्या प्रत्येक फेरीवर आणि टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असेल. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे.

दुसरीकडे, शिक्षक मतदारसंघासाठी ३१० मतदान केंद्रांवर एकूण ३५२ मतपेट्या वापरण्यात आल्या होत्या. या मतदारसंघाची मतमोजणी ४७ टेबलांवर पार पडेल. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी स्वतंत्र हॉल व टेबलांची व्यवस्था केली असून, संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयता आणि पारदर्शकता राखण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतपेट्यांची सुरक्षित हाताळणी, पसंतीक्रमाच्या मतांची वैध-अवैध तपासणी आणि निकालांची अचूक नोंद या बाबींवर निवडणूक निरीक्षक व अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांचे वाटप पूर्ण झाले असून, प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

दरम्यान, मतमोजणीनंतर उमेदवारांचे राजकीय भवितव्य स्पष्ट होणार असल्याने उमेदवार, राजकीय वर्तुळ आणि पदवीधर-शिक्षकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news