

पुणे: आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्त्रीबीज दानासाठी प्रवृत्त करणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख लपवणे आणि नियमांना बगल देत स्त्री बीज मिळवण्याच्या कथित रॅकेटविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईनंतर पुण्यातील अनेक आयव्हीएफ केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे, बारामती आणि नाशिक येथील रुग्णालये व आयव्हीएफ केंद्रांशी संबंधित दहा ठिकाणी ईडीने छापे टाकल्यानंतर पुण्यातील या क्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. अनेक केंद्रांमध्ये संबंधित महिलांना आर्थिक मोबदला दिला जात होता.
विविध मध्यस्थांच्या माध्यमातून ही व्यवस्था चालविली जात असून, संबंधित आयव्हीएफ केंद्रे आणि सहायक प्रजनन तंत्रज्ञान बँकांकडून मध्यस्थांना मोबदला, तसेच आधारकार्ड, प्रतिज्ञापत्रे, संमतीपत्रे, जन्मदाखले, पॅनकार्ड, रक्ततपासणी अहवाल आणि विम्याशी संबंधित कागदपत्रे बनावट तयार करून वापरल्याचेही तपासात समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यामुळे अनेकांचे धाब दणाणले आहेत.
राज्यातील कारवाईनंतर पुण्यातील आयव्हीएफ केंद्रांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमुळे या क्षेत्रातील व्यवहारांच्या पारदर्शकतेचा आणि नियम पालनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही केंद्रे बंद असून, अनेक ठिकाणी कुजबूज सुरू आहे.
ईडीच्या प्रसिद्धिपत्रकात बारामती येथे कारवाई करण्यात आलेल्या संबंधित केंद्राची माहिती गोपनीय ठेवण्यात आली असली, तरी चर्चांवरून तर्कवितर्क लावून संशयास्पद भूमिका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, तपास यंत्रणेकडून पुढे काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
बनावट कागदपत्राद्वारे स्त्रीबीज विक्रीचे रॅकेट
आरोग्याचा धोका
महिलांची खरी ओळख लपविणे, त्यांच्याकडून वारंवार स्त्रीबीज दान करून घेणे आणि त्यांची वैद्यकीय पात्रता योग्य असल्याचे भासविण्यासाठी कथितरीत्या बनावट कागदपत्रांचा आधार घेतला जात होता. या महिलांना महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विविध केंद्रांमध्ये बीज काढण्याच्या प्रक्रियेसाठी पाठविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे महिलांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होण्याबरोबरच वैद्यकीय सुरक्षेच्या निर्धारित नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.