Pune air quality ranking
पुणे: हवेच्या गुणवत्तेत पुणे शहर देशात दहाव्या क्रमांकावर आले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी देशातील 130 शहरांमध्ये पुणे शहराला 23 वे स्थान मिळाले होते. मात्र, वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे आता पुण्याने थेट पहिल्या दहा शहरांत नंबर मिळविला आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयामार्फत देशातील 130 शहरांमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण-2025 करण्यात आले होते. हे सर्वेक्षण एप्रिल-2024 ते 2025 या एका वर्षाच्या कालावधीवर आधारित होते.
या स्वच्छ हवा सर्वेक्षणमध्ये केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सर्वेक्षणासाठी निश्चित केलेल्या पॅरामीटर्समध्ये बायोमास आणि कचरा जाळण्यामुळे होणारे उत्सर्जन, रस्त्यावरील धूळ, बांधकाम यापासून निर्माण होणारे प्रदूषण, वाहनांचे प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण, इतर प्रदूषण, जनजागृती उपक्रम आदी बाबींचा समावेश होता. हे मुद्दे लक्षात घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्व्हेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात पुणे 10 व्या स्थानावर पोहचले आहे.
केंद्र सरकारकडून महापालिकेला 15 व्या वित्त आयोग अंतर्गत 311 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी 162 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामधून शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने वर्षभर विविध उपाययोजना केल्या आहेत.
वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी घंटागाड्या, बसेस तसेच इलेक्ट्रिक वाहने, पी.एम.पी.एम.एल.च्या बसेस इत्यादीचा समावेश आहे. स्मशानभूमीमध्ये गॅस तसेच विद्युत दाहिनीची व्यवस्था करण्यात आली असून, लाकडाचा वापर होणाऱ्या दाहिनीमध्ये हवा प्रदूषण कमी करण्यासाठी एपीसी सिस्टीम बसविण्यात आली आहे. यासोबतच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे.
शहराचे वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षात जी कामे आणि प्रयत्न झाले, त्यामुळे प्रदूषणात घट झाली. महापालिकेच्या प्रयत्नांना पुणेकरांची साथ लाभली. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत पुणे शहर थेट 23 व्या क्रमाकांवरून 10 व्या क्रमांकावर पोहचले.- संतोष वारुळे, उपायुक्त, पर्यावरण विभाग, पुणे मनपा