पुणे: ओ... ताई थांबा, पुढे दोन-चार महिलांचे दागिने हिसकावले आहेत. आम्ही पोलिस आहोत. चोरटे तुमचे देखील दागिने हिसकावतील. त्यामुळे ते दागिने काढून या कागदात ठेवा, असे जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण ते पोलिस नसून ठग आहेत. मागील दोन दिवसांत पुणे शहरात अशा तीन घटना घडल्या आहेत. बाणेर, नऱ्हे आणि आता कात्रज परिसरातही या ठगांच्या टोळीने एका महिलेचे 1 लाख 75 हजार रुपये किमतीचे दागिने पळवले आहेत. प्रामुख्याने ही टोळी ज्येष्ठ महिलांना टार्गेट करत असल्याचे निदर्शनास येते.
वंडरसिटी चौक रोड कात्रज परिसरातून दुचाकीवरून निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी, अंगठी असा 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी, वडगाव बुद्रुक येथील 67 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी (दि. 22) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला दुचाकीने जात होत्या. त्या वेळी आरोपींनी त्यांना थांबविले. पुढे गुंड, चोर आहेत. ते महिलांचे दागिने हिसकावतात. त्यामुळे तुम्ही तुमचे दागिने काढून आमच्याकडील कागदात ठेवा असे सांगितले. त्यानंतर तो कागद महिलेला न देता हातचलाखीने दुसरीच कागदाची पुडी दिली. महिलेने पुडी उघडून पाहिली तेव्हा त्यामध्ये दागिने नव्हते. त्या वेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.
मंगळवारी (दि. 21) पाषाण परिसरात दोघा ठगांनी एका महिलेला आपण पोलिस असल्याचे सांगून अशाच प्रकारे हातचलाखीने 1 लाख 70 हजारांचे दागिने पळवले. ही महिला पाषाण परिसरातून पायी जात होती. त्या वेळी त्यांचे दागिने कागदाच्या पुडीत ठेवण्यास सांगून फसवणूक केली. तसेच नऱ्हे परिसरातील झील कॉलेज जवळील चौकात दोघा तोतयांनी एका ज्येष्ठ व्यक्तीकडील 90 हाजार रुपये किमतीची सोनसाखळी हातचलाखीने लंपास केली.
नागरिकांनो, आपला मौल्यवान ऐवज कुणाच्या हाती देऊ नका
साहेब तपासणीसाठी आले आहेत, असे सांगून तोतयांनी फिर्यादीला थांबविले. त्यानंतर तुमचे दागिने कोणी तरी हिसकावेल, असे सांगत आमच्याकडील पुडीत ठेवा, तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असे म्हणत दागिने लंपास केले. त्यामुळे अशा तोतयांच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता नागरिकांनी आपला मैल्यवान ऐवज कोणाच्या हाती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.