

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही तासांपासून समाजमाध्यमांवर विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता स्वतः पवार कुटुंबीयांनी या चर्चांना पूर्णविराम दिला असून साहेबांची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते सध्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे कार्यकर्त्यांना आश्वस्त केले आहे. त्यांनी म्हटले की, "आदरणीय पवार साहेबांच्या प्रकृतीबाबत अनेक कार्यकर्त्यांनी काळजीपोटी फोन केले आहेत. साहेबांची तब्येत उत्तम असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका कामासाठी माझे नुकतेच त्यांच्याशी फोनवरून बोलणेही झाले. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये."
दुसरीकडे, युवा नेते जय पवार यांनीही बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना अफवांचे खंडन केले. त्यांनी सांगितले की, "माझे रेवती सुळे यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे. त्यांनी स्पष्ट केले की आजोबांना (शरद पवार) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे."
दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पसरणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पवार कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.