IUCAA James Webb Telescope Discovery Pudhari
पुणे

Pune IUCAA James Webb Telescope Discovery: पुण्यातील खगोलशास्त्रज्ञांची विश्वनिर्मितीच्या रहस्यावर मोठी झेप; जेम्स वेब दुर्बिणीतून प्राचीन आकाशगंगांचा शोध

आयुकाच्या संशोधकांचा महत्त्वपूर्ण अभ्यास; बिग बँगनंतर अवघ्या काही दशलक्ष वर्षांतच आकाशगंगा सुव्यवस्थित झाल्याचे निष्कर्ष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ब्रम्हांडनिर्मितीच्या काही अब्ज वर्षे काळातील आकाशगंगांचे चित्र टिपून त्या बाबतची माहिती शोधणारा महत्त्वाचा शोध लावण्यात पुण्यातील खगोलशास्त्रज्ञांना मोठे यश आले आहे. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप च्या मदतीने पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका ) च्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला.

महाविस्फोट (बिग बँग ) झाल्यानंतर काही दशलक्ष वर्षांतच अनेक आकाशगंगा अपेक्षेपेक्षा अधिक सुव्यवस्थित स्वरूपात विकसित झाल्या होत्या. पूर्वीच्या समजुतीनुसार, विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील आकाशगंगा विस्कळीत, अनियमित आणि अजून विकसित होत असलेल्या अवस्थेत असाव्यात, अशी अपेक्षा होती. मात्र, जेम्स वेब दुर्बिणीने टिपलेल्या प्रतिमांमधून यापेक्षा वेगळे चित्र समोर आले आहे. संशोधकांनी अतिदूर असलेल्या आकाशगंगांच्या प्रतिमांचा अभ्यास केला.

संशोधकांचे निष्कर्ष....

  • या आकाशगंगा विश्वाचे वय केवळ ४०० ते ९०० दशलक्ष वर्षे असताना अस्तित्वात होत्या.

  • संशोधकांनी या आकाशगंगांमधील प्रकाशाचे वितरण अत्यंत काळजीपूर्वक मोजून त्यांच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास केला.

  • या अभ्यासातून असे आढळले की, या सुरुवातीच्या गोलाकार (स्फेरॉइडल) आकाशगंगा आज आपल्या आसपास दिसणाऱ्या लंबगोल आकाशगंगांप्रमाणेच कॉरमेंडी रिलेशन या महत्त्वाच्या खगोलशास्त्रीय नियमाचे पालन करतात.

  • हा नियम आकाशगंगेचा आकार आणि तिच्या मध्यभागातील प्रकाशमानता यांच्यातील संबंध स्पष्ट करतो. यावरून विश्वाच्या सुरुवातीच्या काळातच आकाशगंगांची मूलभूत रचना आकाराला येऊ लागली होती हे स्पष्ट होते.

  • या संशोधनामुळे विश्वातील पहिल्या मोठ्या आकाशगंगांची निर्मिती इतक्या कमी कालावधीत कशी झाली आणि त्या इतक्या लवकर सुव्यवस्थित कशा बनल्या, या बाबतच्या सिद्धांतांना नवी दिशा मिळणार आहे.

  • भविष्यातील संगणकीय प्रतिकृती आणि संशोधनासाठीही हा शोध महत्त्वाचा आधार ठरणार आहे.

जेम्स वेब दुर्बिणीच्या विलक्षण क्षमतेमुळे विश्वातील सर्वात प्राचीन आकाशगंगांचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. या निरीक्षणांमुळे आकाशगंगांच्या निर्मिती आणि उत्क्रांतीबाबतच्या आपल्या विद्यमान समजुतींना नवे आयाम मिळत आहेत.
डॉ. अंशुमान बोर्गोहाईन, आयुका, पुणे (संशोधनाचे प्रमुख शास्त्रज्ञ)
गेल्या अनेक दशकांपासून खगोलशास्त्रज्ञ आकाशगंगांच्या उत्क्रांतीचा मागोवा घेण्यासाठी कॉरमेंडी रिलेशनसारख्या नियमांचा वापर करत आहेत. परंतु, जेम्स वेब दुर्बिणीपूर्वी विश्वाच्या पहिल्या अब्ज वर्षांतील आकाशगंगांचा इतक्या तपशीलाने अभ्यास करणे शक्य नव्हते. आता प्रथमच त्या काळातील आकाशगंगांची रचना थेट पाहता येत आहे.
प्रा. कनक साहा, आयुका, संशोधनाचे मार्गदर्शक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT